नैसर्गिक व गो-आधारित शेती ही पर्यावरणस्नेही व शाश्वत उत्पादनाची प्रभावी दिशा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
नैसर्गिक व गो-आधारित शेती ही पर्यावरणस्नेही व शाश्वत उत्पादनाची प्रभावी दिशा
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
किसान सन्मान दिवस, गो-आधारित नैसर्गिक शेती चर्चासत्र व शिवार फेरी
वाशिम,
नैसर्गिक व गो-आधारित शेती ही पर्यावरणस्नेही, खर्च-कमी व शाश्वत उत्पादनाची प्रभावी दिशा असल्याचे नमूद केले. मृदा आरोग्य, पाण्याची गुणवत्ता, जैवविविधता संवर्धन व शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य या सर्व घटकांचा समन्वय साधण्यासाठी अशा पद्धतींचा वैज्ञानिक आधारावर विस्तार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक-आधारित तंत्रज्ञान, प्रमाणीकरण व बाजार संलग्नता यांचा लाभ घ्यावा, तसेच प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.
भारताचे माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त २३ डिसेंबर २०२५ रोजी रिसोड तालुक्यातील मौजे बिबखेडा येथे किसान सन्मान दिवस निमित्त गोकृपा-आधारित नैसर्गिक शेती चर्चासत्र व शिवार फेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भक्ती वेदांत मठ, पोहरादेवी येथील परमपूज्य साहेबराव शास्त्री महाराज उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून लभाणा समाज धर्मगुरू (तेलंगणा) सुरेश महाराज, केंद्रीय गोरक्षा समिती (विश्व हिंदू परिषद, मुंबई) लक्षीनारायण चांडक, आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक (नांदेड) हर्षल जैन, तहसीलदार रिसोड श्रीमती प्रतीक्षा तेजनकर, ह.भ.प. जायभाये महाराज, पोलिस निरीक्षक रिसोड रामेश्वर चव्हाण, डॉ. विजयप्रसाद तिवारी, व्यापारी देविदास नागरे, जिल्हा शांतता समितीचे अध्यक्ष मंचकराव देशमुख, डॉ. प्रशांत आटोळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांची उपस्थिती लाभली.
शिवार फेरी व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गोकृपा-आधारित नैसर्गिक शेती पद्धतीने लागवड केलेल्या हळदीच्या प्रात्यक्षिक प्लॉट, गोपालन केंद्र तसेच नैसर्गिक उत्पादन केंद्र यांची प्रत्यक्ष शिवार फेरी माननीय जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते घेण्यात आली. यावेळी सुशांत आटोळे यांनी प्रयोगात्मक प्लॉटवरील पिक व्यवस्थापन, पोषण तंत्रज्ञान व उत्पादन खर्चातील बचतीची सविस्तर माहिती दिली.
करडा येथील गोमाता सेंद्रिय महिला बचत गटाच्या महिलांनी गो-आधारित शेती पद्धतीमुळे मातीच्या सुपीकतेत वाढ, निविष्ठा खर्चात घट व उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा याविषयी अनुभव कथन केले.
तांत्रिक चर्चासत्र
तांत्रिक सत्राच्या प्रास्ताविकात सुशांत आटोळे यांनी रासायनिक शेती व गोकृपा-आधारित नैसर्गिक शेती पद्धतीतील तांत्रिक फरक, मृदा-सूक्ष्मजीवांची भूमिका, निविष्ठा स्वावलंबन व आर्थिक लाभ याबाबत अनुभव मांडले. त्यानंतर गोकृपा नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारलेल्या दहा निवडक प्रगतिशील शेतकऱ्यांनी या पद्धतीच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत साक्ष दिली.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी उपलब्ध आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शेतीला उद्योगाचा दर्जा देत व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्पादन घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्व. चौधरी चरणसिंग यांच्या शेतकरी-केंद्रित धोरणे व भारतीय शेती विकासातील योगदानावर प्रकाश टाकला.
उद्यानविद्या तज्ञ श्रीमती निवृत्ती पाटील यांनी गोकृपा-आधारित नैसर्गिक शेतीचे तांत्रिक पैलू, गोकृपा अमृत तयार करण्याची शास्त्रीय पद्धत, पिकांतील वापरानंतर झालेली निविष्ठा बचत व उत्पादन गुणवत्ता सुधारणा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक हर्षल जैन (नांदेड) यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरणातील आवश्यक टप्पे, मानके, बाजार संधी व निर्यात क्षमता याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. एस. के. देशमुख यांनी रोजगार व उपजीविका हमी अभियान (ग्रामीण कायदा) यातील शेतकरी-हितकारी तरतुदी व कृषी-पूरक बदलांबाबत जनजागृती केली.
समारोपीय मार्गदर्शनात साहेबराव शास्त्री महाराज (पोहरादेवी) यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, शुद्ध अन्ननिर्मिती, सुखी शेतकरी व निरोगी समाज या त्रिसूत्रीवर मार्गदर्शन केले.
किसान सन्मान
किसान सन्मान दिनाच्या औचित्याने पूजा देशमुख, लता देशमुख, उर्मिला देशमुख, निसार कुरेशी, नितीन घावडे, संतोष राऊत, संदीप बोरकर व दत्तराव बोरकर या प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, महिला बचत गटांच्या सदस्या, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, नवचैतन्य गोकृपा अमृत परिवार व युवा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार कृष्णा मानवतकर यांनी केले.
0 Response to "नैसर्गिक व गो-आधारित शेती ही पर्यावरणस्नेही व शाश्वत उत्पादनाची प्रभावी दिशा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर "
Post a Comment