-->

जिल्ह्यातील आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण सेवांवर आधारित असावी

जिल्ह्यातील आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण सेवांवर आधारित असावी



साप्ताहिक सागर आदित्य 

 जिल्ह्यातील आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण सेवांवर आधारित असावी

       जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 


जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विषयक विविध समितींच्या सभा 



जिल्ह्यातील आरोग्य सेवा ही केवळ उपचारांपुरती मर्यादित न राहता प्रतिबंध, जनजागृती आणि गुणवत्तापूर्ण सेवांवर आधारित असावी. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व सिकलसेल आजार निर्मूलन अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागीय समन्वय, नियमित तपासणी व लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थांमधील सेवा-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आरकेएस अंतर्गत उपलब्ध संसाधनांचा योग्य व पारदर्शक वापर केला पाहिजे. तसेच १५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग नियोजनबद्ध पद्धतीने करून नागरिकांच्या आरोग्य व जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून वेळबद्ध व परिणामकारक अंमलबजावणी करावी,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.


जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने जिल्हा सुकाणू समिती, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, आरकेएस (रुग्ण कल्याण समिती) कमिटी, सिकलसेल आजार निर्मूलन अभियान तसेच १५ वा वित्त आयोग अंतर्गत जिल्हास्तरीय डीएलसी (DLC) सभांचे आयोजन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.


या बैठकीदरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजना, प्रतिबंधात्मक कार्यक्रम व विकासात्मक उपक्रमांची सविस्तर माहिती घेऊन त्यांची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील अडथळे आणि भविष्यातील कार्ययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविणे, लाभार्थ्यांपर्यंत सेवा वेळेत व प्रभावीपणे पोहोचविणे तसेच शासकीय यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट करण्यावर विशेष भर दिला.


राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे होणाऱ्या गंभीर आजारांबाबत जनजागृती वाढविणे, शाळा-महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी विशेष मोहिमा राबविणे तसेच कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. सिकलसेल आजार निर्मूलन अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी व संवेदनशील भागांमध्ये तपासणी शिबिरे, लवकर निदान, उपचार व समुपदेशन यावर भर देत रुग्णनोंदणी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. आरकेएस कमिटीच्या बैठकीत शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थांमधील सुविधा, औषधपुरवठा, मनुष्यबळ व पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन सेवा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली.


 १५ व्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध निधीचा आरोग्य, स्वच्छता व मूलभूत सुविधा विकासासाठी नियोजनबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक वापर करण्यावर भर देण्यात आला. निधी खर्च करताना गुणवत्तेची कामे, वेळेत अंमलबजावणी आणि नागरिकांना थेट लाभ मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या महत्त्वपूर्ण सभांना मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, डॉ. पी. एस. ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी, मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे  अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून जिल्ह्यातील आरोग्य व विकासात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावेत, असे आवाहन केले.


बैठकीच्या अनुषंगाने विविध आरोग्य कार्यक्रम व योजनांबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे तसेच डॉ. पी. एस. ठोंबरे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सिकलसेल आजार निर्मूलन अभियान, आरकेएस अंतर्गत रुग्णालयीन सेवा व १५ व्या वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, उपलब्ध निधीचा वापर, अंमलबजावणीतील अडचणी व पुढील कार्ययोजना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. सादरीकरणादरम्यान विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक सुधारणा व समन्वयाबाबतही चर्चा करण्यात आली.


पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले,

जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने डीएचओंनी पीएससी व सब-सेंटर निहाय सविस्तर आढावा घेण्यात यावा. तालुका निहाय नव्याने नंबर ऑफ सेशन प्लॅन व व्हॅक्सिनेशन सेशन प्लॅन तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच SAS कॅम्पेनच्या अनुषंगाने सन २०१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

एचपीव्ही (HPV) कार्यक्रमांतर्गत शालेय स्तरावर नियमित सेशन्स आयोजित करावीत. त्याचबरोबर सर्वाइकल कॅन्सर सर्वेक्षण प्रभावीपणे राबवावे. या प्रक्रियेत डिजिटल व फिजिकल मोबिलायझेशनवर विशेष लक्ष देण्यात यावे. Quality Assurance Programच्या अनुषंगाने पुढील टप्प्यासाठी स्पष्ट Action Plan तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. संबंधित तालुका आरोग्य अधिकारी (THO) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

पीएससी स्तरावर आवश्यक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांचा आढावा घेऊन त्यासाठी किती निधी लागेल याचा सखोल अभ्यास करावा. निधी उपलब्धतेसाठी विविध सोर्सेसवर लक्ष केंद्रित करण्यात यावे. तसेच NQAS अंतर्गत १४ पीएससी व ३ आरएच यांनी विशेष लक्ष केंद्रित करून गुणवत्ता सुधारणा प्रस्ताव सादर करावेत.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवायांची सविस्तर माहिती संकलित करून ती सादर करावी. यापुढील काळात नगरपरिषद व पोलीस विभाग यांच्या संयुक्त कारवाया अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

शिक्षण अधिनियम पाच व सात अंतर्गत अपेक्षित कार्यवाहीबाबत शाळा परिसराच्या १०० मीटर अंतरात आतापर्यंत करण्यात आलेल्या ठोस कारवायांचे सविस्तर ब्रीफिंग सादर करावे. पुढील काळात अशा प्रकरणांमध्ये दंडात्मक कार्यवाही स्पष्टपणे दिसून यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.


बैठकीस जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित योजनांची अंमलबजावणी, क्षेत्रीय पातळीवरील अनुभव तसेच येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. यामुळे आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्यवाहीस दिशा देण्यात आली.

0 Response to "जिल्ह्यातील आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण सेवांवर आधारित असावी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article