
येवता येथे राजस्व अभियानांतर्गत सेवा शिबिर संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
सेवा परमो धर्म !
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
येवता येथे राजस्व अभियानांतर्गत सेवा शिबिर संपन्न
वाशिम, “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा” या उपक्रमांतर्गत कारंजा तालुक्यातील येवता येथे आज दि.२७ सप्टेंबर रोजी शनिवारी राजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आदिवासी बहुल भागातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा सदस्य आ. सईताई डहाके उपस्थित होत्या.जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) वीरेंद्र जाधव, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, तहसीलदार कुणाल झाल्टे, इंझा सरपंच राधिका नाखले, येवता सरपंच सरस्वती वानखडे यांची उपस्थिती होती.
या शिबिरात जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी “सेवा परमो धर्म” या संकल्पनेनुसार अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना पारदर्शक आणि सुलभ शासकीय सेवा द्याव्यात, असे आवाहन केले.
शिबिरात जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, सनद वाटप, आयुष्मान भारत (आभा) व गोल्डन कार्ड वितरण, राशन कार्ड नोंदणी व सुधारणा, तसेच बेबी किट वाटप आदी सेवा देण्यात आल्या. एकूण १ हजार १०५ नागरिक शिबिरात सहभागी झाले असून ७७६ लाभांचे वितरण करण्यात आले.
तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार विनोद हरणे, गटविकास अधिकारी पुनम राणे, उपाधीक्षक भूमी अभिलेख विनोद जाधव, पुरवठा विभागाच्या स्मिता नायगावकर, एकात्मिक बालविकास अधिकारी लुंगे यांनी योजनांची माहिती दिली. दाखले वाटपाचे नियोजन निवासी नायब तहसीलदार अनिल वाडेकर यांनी केले.
शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शासकीय प्रमाणपत्रे, सामाजिक सुरक्षा योजना आणि आरोग्यसेवा ग्रामीण जनतेपर्यंत एका दिवसात पोहोचवून या शिबिराने “सेवा परमो धर्म” या संकल्पनेला न्याय देण्याचा प्रयत्न झाला.
0 Response to "येवता येथे राजस्व अभियानांतर्गत सेवा शिबिर संपन्न"
Post a Comment