‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांना महिलांचा प्रतिसाद आवश्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांना महिलांचा प्रतिसाद आवश्यक
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
वाशिम, : महिलांचे आरोग्य हे संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे. याच उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे , सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालये येथे या अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
या शिबिरांमध्ये महिलांसाठी प्रतिबंधात्मक, आरोग्यवर्धक आणि उपचारात्मक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांची तपासणी केली जाणार आहे. तसेच रक्तक्षय (ॲनिमिया) तपासणी, क्षयरोग व सिकल सेल तपासणी, गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी , माता व बाल संरक्षण कार्ड वितरण, तसेच लसीकरण सेवा पुरविण्यात येतील.
महिलांसाठी पोषण, मासिक पाळीची स्वच्छता व निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन होणार असून, रक्तदान शिबिरे व मानसिक आरोग्याबाबत समुपदेशनही करण्यात येईल. याशिवाय आयुष्मान भारत, आभा कार्ड व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यांसाठी नोंदणी व मदत डेस्कही उपलब्ध राहील.
जागरूकता वाढविण्यासाठी शिबिरांच्या आयोजनात लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. खासदार, आमदार, सरपंच आणि स्थानिक नेते यांना उद्घाटन कार्यक्रमासाठी व लाभार्थ्यांना कार्ड वितरणासाठी आमंत्रित करण्यात येईल. समुदायातील प्रत्येक महिलेला शिबिराची माहिती मिळावी यासाठी घराघरात जाऊन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्यांनी महिलांनी मोठ्या संख्येने शिबिरात हजेरी लावून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले.
हे अभियान केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी सजग करण्याचे व त्यांना सशक्त बनविण्याचे महत्त्वाचे साधन ठरणार आहे.
0 Response to " ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांना महिलांचा प्रतिसाद आवश्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर "
Post a Comment