लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा
साप्ताहिक सागर आदित्य
लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
· तीन टप्प्यात ‘सेवा पंधरवडा ; नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार
· जिल्हा प्रशासन सज्ज
वाशिम, : महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विविध उपक्रम राबवून तीन टप्प्यात ‘सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सेवा पंधरवडयातील उपक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.
सेवा पंधरवडया निमित्त लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम महसूल प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने महसूल व वने विभागामार्फत १७ ते २२ सप्टेंबर, २३ ते २७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर अशा तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. सेवा पंधरवडा दरम्यान राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची अंमलबजावणी करीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्यांबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत गावांच्या पाणंद किंवा शिवरस्त्यांचे सर्वेक्षण करणे व त्यांना क्रमांक देण्याचे काम प्राधान्याने करण्यात येणार आहे. यासोबतच नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद घेण्याचे आणि शेतरस्त्यांच्या सीमांकन व रस्त्यांविषयीच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता सीमांकन व रस्ता अदालतांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रमांतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून घर देण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे. व इतर घरकुल लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमानुकुल करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे.
पंधरवडयाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्याला नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे उद्दिष्टय देण्यात आले आहे. याअंतर्गत जनसंवाद/ आदिसेतू अभियान राबवून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत मंडळस्तरावर विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १५५ अंतर्गत पारीत आदेशांची तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.
७/१२ अद्यावतीकरण, जिवंत ७/१२ मोहिम टप्पा १ व २ अंतर्गत वारसाहक्क नोंदी अद्यावत करणे, पोटखराब क्षेत्र नोंदी व महिला वारस नोंदी अद्यावत करणे. प्रलंबित न्यायालयीन व अर्ध न्यायिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्राप्त प्रकरणांची मंडळ स्तरावर चौकशी करणे, स्थळ पहाणी करुन अहवाल अंतिम करणे व प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी संवाद उपक्रमाची अंमलबजावणी मंडळस्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामुळे जमीन व्यवहार पारदर्शक होतील आणि नागरिकांना तात्काळ माहिती व सेवा मिळणार आहे.
आपल्या जिल्ह्याला अधिक सुसज्ज आणि सेवाभिमुख बनवूया ! ‘सेवा पंधरवडा’ दरम्यान नागरिकांची मते, सूचना आणि सहभाग महत्त्वाचा आहे. रस्ते, घरं, शेतकरी समस्या किंवा इतर तक्रारी असतील, तर त्यांनी खुलेपणाने नोंद करून प्रशासनास कळवा. आपल्या सहभागानेच बदल शक्य आहे. “सेवा पंधरवाडा” हा शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी आणि आपल्या समस्या मांडण्यासाठी नागरिकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. सर्वांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0 Response to "लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा"
Post a Comment