
वाशिम जिल्ह्यात विकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी- पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्यात विकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी- पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे
> भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात;
> शेती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरणात उल्लेखनीय प्रगती
वाशिम, दि. 15 (जिमाका) –वाशिम जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पायाभूत सुविधा, शेती, महिला सक्षमीकरण, सामाजिक कल्याण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. या योजनांमुळे प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले.
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, अपर पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेत आतापर्यंत 17 हजार 991 घरकुले पूर्ण तर 69 हजार 379 घरकुलांना मान्यता मिळाली आहे. रमाई आवास योजनेत 10 हजार 823, शबरी आवास योजनेत 2 हजार 117 आणि मोदी आवास योजनेत 8 हजार 328 घरकुले पूर्ण झाली आहेत. संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेत 55 कामांसाठी 5 कोटी 60 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे.
शेतकरी हितासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना 159 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून, आतापर्यंत 55 हजार 916 शेतकऱ्यांना 71 कोटी 36 लाख रुपये वितरित झाले आहेत. चिया पीक लागवडीत वाशिम जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर असून, 3 हजार 605 हेक्टरवर लागवड झाली आहे. चिया बियाणे विक्रीचे पूर्व नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांना यंदा प्रतिक्विंटल 24 हजार रुपये दर मिळाला आहे.
‘मनरेगा’ अंतर्गत 816 हेक्टर क्षेत्रावर फळबाग, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत 256 हेक्टरवर लागवड, तर ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेत 6 हजार 691 शेतकऱ्यांना 1 हजार 268 लाख रुपये वितरित झाले आहेत. याशिवाय प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत 15 लाभार्थ्यांना 3 कोटी 22 लक्ष रुपये तर शेती यांत्रिकीकरणासाठी 182 लाभार्थ्यांना 1 कोटी 7 लक्ष रुपये अनुदान देण्यात आले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत जिल्ह्यात 10 हजार हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत 41 कोटी 71 लक्ष रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. 60 टक्के अनुदानाप्रमाणे 25 कोटी 14 लक्ष रुपये अनुदान उपलब्ध होणार असून त्यापैकी 7 कोटी 71 लक्ष रुपये अनुदान शेतकरी उत्पादक कंपन्यांना वितरित करण्यात आले आहे.
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 40 हजार 41 महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, 10 हजार 541 महिला बचत गटांना 324 कोटी रुपये कर्ज वितरित झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत 2 हजार 239 कामे सुरु असून, 10 हजार 195 मजूर कार्यरत आहेत. जिल्ह्यात 1 हजार 135 कुटुंबांनी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस कामे दिल्या गेली असून वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत आजपर्यंत 10 हजार 74 सिंचन विहिरी पुर्ण करण्यात आले असल्याची माहिती यावेळी दिली.
जिल्ह्यातील आरोग्य सेवेत केलेल्या उल्लेखनिय कार्यासाठी राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत ‘मिशन डबलिंग फार्मर्स इन्कम’ साठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांक, तर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना कार्यालयीन व्यवस्थापन, अभिलेख कक्ष सुधारणा आणि पोलीस कल्याणकारी योजनांसाठी द्वितीय क्रमांक पुरस्कार मिळाला आहे.
जिल्ह्यात राबविण्यात आलेली ‘जलतारा’ ही लोकचळवळ देशात आदर्श उदाहरण ठरली आहे. भूजल पुनर्भरणाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करणाऱ्या 25 गावांना प्रोत्साहनपर पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्यात केवळ 40 दिवसात 40 हजार जलतारा शोषखड्डे तयार करून जलसंधारणाच्या बाबतीत केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड" (लंडन) मध्ये नोंद केली असून, ‘मिशन आशीर्वाद’ ला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 8 कोटी 60 लक्ष रुपये असा संपूर्ण 100 टक्के निधी खर्च करण्यात आला. या दोन्ही योजनेमुळे 1 हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहेत. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 310 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, 1 हजार 651 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत 50 हजार 517 अंत्योदय व 8 लाख 23 हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत 1 लाख 31 हजार लाभार्थ्यांना वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जात आहेत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी यावर्षीपासून ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्राम, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष समित्यांचे गठण करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कार्यान्वित झाली आहे. यामुळे नागरीकांना गावातच शासकीय सेवा मिळणार असून वेळ व खर्चाची बचत होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कार्यान्वित झाली असून, ग्रामविकास विभागाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हाती घेतले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हावासीयांनी विकासाची प्रक्रिया अधिक वेगाने राबविण्याचा आणि महाराष्ट्र अधिक सशक्त व विकसित करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले.
यावेळी चार चाकी वाहनांना पालकमंत्री ना. भरणे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रातिनिधीक स्वरुपात अपर जिल्हाधिकारी यांना हस्तांतरीत करण्यात आले. प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रिती मेहकरकर व मोहन शिरसाट यांनी तर आभार अर्चना घोळवे यांनी मानले. यावेळी पदमश्री नामदेव कांबळे, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता तसेच लोकप्रतिनिधी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
विविध पुरस्कारांचे वितरण
कार्यक्रमांत विविध पुरस्कारांचे वितरण कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वीरपत्नी, अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
जिल्हयातील शहिद झालेल्या कुटूंबीयांच्या वीरपत्नी यांचा सत्कार लास नायंक दगडू लहाने यांच्या वीरपत्नी पार्वती दगडू लहाने, शिपाई सरकटे यशवंत यांच्या पत्नी शांताबाई सरकटे, नायक अमोल गोरे यांच्या पत्नी वैशाली अमोल गोरे, शौर्य पदकधारक हवलदार योगराज नागुलकर यांच्या पत्नी मीराबाई योगराज नागुलकर तर स्वातंत्र सैनिक दिवंगत जनार्धन भाऊराव खेडकर यांच्या पत्नी साधना जनार्धन खेडकर यांचा सत्कार करण्यात आला.
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीमेत उत्कृष्ट कार्यालय
जिल्हास्तरीय कार्यालय प्रथम क्रमांक जिल्हा शल्य चिकित्सक, तिसरा क्रमांक सहायक आयुक्त मत्सव्यवसाय व जिल्हा कोषागार कार्यालय.
तालुकास्तीय कार्यालय प्रथम क्रमांक उप विभागीय कृषी अधिकारी वाशिम व प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना मालेगाव. व्दितीय क्रमांक पशुधन विकास अधिकारी रिसोड, तृतीय क्रमांक मंगरुळपीर तालुका वैद्यकीय अधिकारी, वाशिम शहर पोलीस स्टेशन, मंगरुळपीर प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व उपविभागीय जलसंधारण अधिकारी रिसोड.
प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) अंतर्गत सर्वोत्कृष्ठ तालुके प्रथम क्रमांक कारंजा, द्वितीय मालेगाव, तृतीय रिसोड.
प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) अंतर्गत सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायती प्रथम क्रमांक वाशिम तालुक्यातील ग्रामपंचायत कोकलगाव, द्वितीय मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे व तृतीय कारंजा तालुक्यातील गायवळ.
राज्य पुरस्कृत आवास योजना(ग्रामीण) अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुके : प्रथम क्रमांक कारंजा, द्वितीय मानोरा, तृतीय मालेगाव.
राज्य पुरस्कृत आवास योजना(ग्रामीण) अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती प्रथम क्रमांक ग्रामपंचायत वाशिम तालुक्यातील अनसिंग, द्वितीय कारंजा तालुक्यातील कामरगाव, तृतीय मालेगाव तालुक्यातील हनवतखेंडा.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा दिल्याबद्दल कारंजा तहसिल कार्यालयाचे निवासी नायब तहसिलदार अनिल विठ्ठलराव वाडेकर, मंगरुळपीर तहसिल कार्यालयाचे रविंद्र गणपतराव राठोड, मानोरा तहसिल कार्यालयाचे मधूकर विठ्ठलराव अस्टुरे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ प्रमोदजी लुणावत जैन.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये शोध व बचाव कार्यात उलेखनिय कार्य दिपक सदाफळे (मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊडेशन संचालीत संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर ता. बार्शिटाकळी), श्याम सवाई (सर्वधर्म मित्रमंडळ सास शोध व बचाव पथक कारंजा, गजानन मेसरे छत्रपती बहुउद्देशीय तरुणमित्र मंडळ वाशिम), बापुराव डोगरे (श्रीमती साळुकांबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा ता.मंगळरुळपीर) व अमोल रामभाऊ काळे (श्री. बाकलीवाल विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम).
अंगदान जिवन संजीवनी अभियानांतर्गत अवयवदात्यांचे सत्कार पुष्पलता नंदकिशोर इन्नाणी, भागुबाई कुंडलीक मुखमाले, मोहनलाल राधाकृष्ण खटोड, रामगोपाल मंगेलाल सोनी, जनाबाई लेखराज मानकाणी, विनायक नानासाहेब पाटील, प्रभाकर गणपत वानखेडे व यादवराव विठोबा वानखेडे यांनी डोळे अवयवदान तर बदरुन्नीसाबी मो. सिकंदर व लता संतोष चव्हाण यांनी मुत्रपिंड दान केले.
‘जलतारा’ ही लोकचळवळीअंतर्गत जिल्ह्यातील सर्वात जास्त जलतारा करणारे महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच जलतारा कार्यक्रमाला आर्थिक मदत देणाऱ्या दात्यांचे यावेळी पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0 Response to "वाशिम जिल्ह्यात विकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी- पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे"
Post a Comment