
शेतकऱ्यांच्या मेहनतीला मान्यता; खरीप हंगाम २०२५ पिकस्पर्धेसाठी अर्ज सुरू
साप्ताहिक सागर आदित्य
शेतकऱ्यांच्या मेहनतीला मान्यता; खरीप हंगाम २०२५ पिकस्पर्धेसाठी अर्ज सुरू
राज्यातील प्रयोगशील आणि प्रेरणादायी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२५ साठी पिकस्पर्धा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सूर्यफूल या ११ पिकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सर्वसामान्य आणि आदिवासी गट अशा दोन प्रवर्गात स्पर्धा घेतली जाणार आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्ये
अर्ज करण्याची अंतिम मुदत: मूग, उडीद – ३१ जुलै २०२५, उर्वरित पिके – ३१ ऑगस्ट २०२५.
प्रवेश शुल्क: सर्वसामान्य गट – ₹३००, आदिवासी गट – ₹१५०.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ), ७/१२, ८-अ, प्रवेश शुल्क चलन, नकाशा, बँक खातेची छायांकित प्रत, आदिवासी गटासाठी जात प्रमाणपत्र.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या नावावर असलेल्या आणि स्वतः कसत असलेल्या जमिनीवर घेतलेल्या पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येणार असून, एकापेक्षा अधिक पिकांसाठी अर्ज करता येईल. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य या तीन पातळ्यांवर घेतली जाणार आहे.
बक्षिसांचे स्वरूप (प्रत्येक गटासाठी):
तालुकास्तरावर: प्रथम – ₹५,०००, द्वितीय – ₹३,०००, तृतीय – ₹२,०००
जिल्हास्तरावर: प्रथम – ₹१०,०००, द्वितीय – ₹७,०००, तृतीय – ₹५,०००
राज्यस्तरावर: प्रथम – ₹५०,०००, द्वितीय – ₹४०,०००, तृतीय – ₹३०,०००
ही स्पर्धा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आणि अधिक उत्पादकता साध्य करण्यास प्रोत्साहन देईल. त्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळून एकूण कृषी उत्पादन वाढण्यास हातभार लागेल.
"जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकस्पर्धेत सहभाग घ्यावा," असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. अतुल जावळे यांनी केले आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
0 Response to "शेतकऱ्यांच्या मेहनतीला मान्यता; खरीप हंगाम २०२५ पिकस्पर्धेसाठी अर्ज सुरू"
Post a Comment