स्मार्ट प्रकल्पांतर्गत वाशिम येथे जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन संपन्न शेतकरी उत्पादकांसाठी नवी संधी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.
साप्ताहिक सागर आदित्य
स्मार्ट प्रकल्पांतर्गत वाशिम येथे जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन संपन्न
शेतकरी उत्पादकांसाठी नवी संधी
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.
वाशिम,
शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूल्यसाखळी विकसित करणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना वाव मिळाला तर जिल्ह्यातील शेतकरी आवश्यक मानकांनुसार दर्जेदार माल उपलब्ध करून देतील.
नुकतेच बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, आत्मा कार्यालय, वाशिम यांच्या वतीने खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमात आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह , स्मार्टचे विभागीय नोडल अधिकारी प्रशांत नाईक,उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके एम आय एस तज्ज्ञ मिलिंद वानखेडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
खरेदीदार व विक्रेते यांचा सहभाग :
या कार्यक्रमात राज्यातील आणि राज्याबाहेरील ११ खरेदीदार कंपन्यांनी सहभाग घेतला. तसेच, स्मार्ट प्रकल्पाशी संलग्न २७ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमादरम्यान ११ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी खरेदीदारांसोबत शेतमाल विक्रीसाठी करार केले. यामध्ये एडीएम कंपनीने विशेष पुढाकार घेतला व जिल्ह्यातील ८ कंपन्यांसोबत करार केला. कंपनीने जिल्ह्यातील ५ लाख मे.टन शेतमालाची आवश्यकता असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी आतापर्यंत १४५ कंपन्यांसोबत करार करत ७०० कोटींचा व्यवहार पूर्ण केल्याची माहिती दिली.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतमाल विक्रीसाठी योग्य दिशा दिली. त्यांनी खरेदीदार कंपन्यांना आश्वस्त केले की, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आवश्यक मानकांनुसार दर्जेदार माल उपलब्ध करून देतील. तसेच, प्रशासनाकडून खरेदीदारांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूल्यसाखळी विकसित करणे अत्यावश्यक आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी असेही मत व्यक्त केले.
विभागीय नोडल अधिकारी प्रशांत नाईक यांनी स्मार्ट प्रकल्पाची सविस्तर माहिती व सद्यस्थिती मांडली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या मालाचे उत्पादन वाढवून त्याचे प्रभावी मार्केटिंग करण्याचा सल्ला दिला.
प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी खरेदीदार व विक्रेत्यांमध्ये सामंजस्य करार घडवण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे संचालन श्रीपाद जाधव तर आभार जयप्रकाश लव्हाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी संतोष बांगर, गुलाम नवी शेख, अमोल खडसे, प्रेम राठोड, सचिन गोटे, योगेश वेले, दिलीप खडसे यांनी पुढाकार घेतला.
0 Response to "स्मार्ट प्रकल्पांतर्गत वाशिम येथे जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन संपन्न शेतकरी उत्पादकांसाठी नवी संधी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस."
Post a Comment