देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन
साप्ताहिक सागर आदित्य
देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार
लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन
मुंबई, दि. ५ : अलोट जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मंत्रालयात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांना अभिवादन केले. दरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रालयात आगमन झाल्यावर लाडक्या बहीणींनी औक्षण करून अभिनंदन केले. वैष्णवी जितेंद्र खामकर, मनाली महेश नारकर, शारदा शरद कदम, प्राची प्रफुल्ल पवार, रेखा शेमशोन आढाव या लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण केले तर श्रीमती लिलाबाई चव्हाण व श्रीमती रेणुका राठोड यांनी पुष्पगुच्छ देवून प्रातिनिधीक स्वरूपात राज्यातील लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन केले.
0000
वृत्त क्र. २३०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’
‘माहिती व जनसंपर्क’तर्फे अनोखी मानवंदना
माहितीपट आणि चित्रपटाचे महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार
मुंबई, दि. ५ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपट आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.
‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. माहितीपट व चित्रपटाच्या प्रसारणाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.
एक्स – https://x.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपटाचे सकाळी ११ वा. प्रसारण
‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता. महासंचालनालयाच्या एक्स, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १७ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.
या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याची ऐतिहासिक घटना दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंतिम दर्शनाचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. जी.जी. पाटील यांनी संकलन केले आहे. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर संगीत दत्ता डावजेकर यांचे आहे. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.
‘बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचे दुपारी १ वा. प्रसारण
भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ ची निर्मिती असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता महासंचालनालयाच्या एक्स, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन.एस. थापा यांनी १९८१ मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे दुपारी ४ वा. प्रसारण
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी ४ वाजता महासंचालनालयाच्या एक्स, या समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा.
या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.
०००
वृत्त क्र. २२९
महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावे, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सचिव प्रवीण पुरो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.
देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य राहील यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करून विकासाचा वेग वाढविण्यात येईल. मागील अडीच वर्षांत राज्य शासनाने घेतलेले विविध निर्णय कायम राहतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना सुरूच राहतील. त्यांची आगामी काळात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने मागील काळात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील. त्यात नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू करण्यावर भर राहील. सन २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. राज्यातील जनतेच्या आमच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले जातील. समृद्धी महामार्गामुळे जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढण्यास मदत होत आहे. याच धर्तीवर शक्तीपीठ मार्गासाठी संबंधित भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढण्यात येईल.
राज्यात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक उद्योगांशी चर्चा सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. हे उद्योग राज्यात आल्यानंतर रोजगार निश्चित वाढेल. मागील वर्षभरात राज्यात थेट परकीय गुंतवणुकीपैकी 90 टक्के गुंतवणूक केवळ मागील सहा महिन्यात आली आहे. हा वेग असाच कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या शक्ती कायद्याबाबत केंद्र सरकारशी संवाद साधण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
०००००
वृत्त क्र. २२८
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन
मुंबई, दि.५ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच जिजामाता शहाजीराजे भोसले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000
वृत्त क्र. २२७
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची
पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
· पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.
चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
0000
वृत्त क्र. २२६
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत
ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी
उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतली शपथ
मुंबई, दि. ५ : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.
आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच डी कुमारस्वामी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सूक्ष्म मध्यम लघू उद्योगमंत्री जितनराम मांझी, केंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधिया, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यु रिओ, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, केंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, विविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, पवन कल्याण, राजेंद्र शुक्ला, अरुण सावो, विजय शर्मा, प्रेमचंद बैरवा, विजयकुमार सिन्हा, सम्राट चौधरी, कनक बर्धन सिंह देव, प्रवती परिदा, चौना मेन, प्रेसतोन त्यांसोंग, यांथुंगो पटॉन, टी. आर. झेलियांग, एस धार, श्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधू, संत, महंत, विविध धर्मांचे गुरु, राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवर, विशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली.
००००
फडणवीस, श्री. देवेंद्र गंगाधरराव
जन्म : २२ जुलै, १९७०
जन्म ठिकाण : नागपूर
शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.ए., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डी.एस.ई. बर्लिन, जर्मनी येथून उत्तीर्ण
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अमृता.
अपत्ये : एकूण १ (एक मुलगी).
व्यवसाय : सामाजिक कार्य.
पक्ष : भारतीय जनता पक्ष.
मतदार संघ : ५२ - नागपूर (दक्षिण-पश्चिम), जिल्हा - नागपूर.
इतर माहिती :
कार्यकारी सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (युनायटेड नेशन्सद्वारा मान्यता प्राप्त संस्था): उपाध्यक्ष, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक (भोसला मिलिटरी स्कूल), उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था, अध्यक्ष, स्व. आबाजी थत्ते अनुसंधान संस्थानचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर; अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केट बॉल संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विविध उपक्रमात सहभाग.
१९८९ वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, धरमपेठ वॉर्ड, नागपूर; १९९० प्रसिद्धी प्रमुख, भाजप, नागपूर (पश्चिम); १९९२-९५ अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, नागपूर शहर; १९९५-२००४ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, भारतीय जनता युवा मार्चा; २००४ - २००९, २००९ – २०१४ राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा; २००९ भाजप विदर्भ निवडणूक प्रमुख, २०१० महामंत्री, २०१२-२०१४ प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; ग्लोबल पार्लमेंट या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे प्रथम भारतीय लोकप्रतिनिधी; उपाध्यक्ष, ग्लोबल पार्लमेंट फोरम, हाबीतात; १९९२ व १९९७ नागपूर महानगर पालिका सदस्य व १९९७ मध्ये महापौर, महानगरपालिका, नागपूर; १९९८ मे अरइन कौन्सिल पद्धती अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड;
१९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, सदस्य, विधानमंडळ नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, विनंती अर्ज समिती, गृहनिर्माण व नगरविकास स्थायी समिती सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समिती; सदस्य, कार्यकारी परिषद डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ; ओ.बी. सी, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न; अध्यक्ष, निती आयोग शेती विषयक उच्चाधिकार समिती, भारत सरकार, राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने सन २००३ या वर्षाचा महाराष्ट्र विधानसभेतील "उत्कृष्ट संसदपटु" पुरस्कार प्राप्तः 'उत्कृष्ट वक्ता' म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त; रोटरी क्लबचा "मोस्ट चॅलेंजिंग युथ अॅवार्ड" प्राप्त, हिंदू लॉ विषयात नागपूर विद्यापीठाचा "बी. के. बोस अॅवॉर्ड" प्राप्त; प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मुक्तचंद पुणे या संस्थे तर्फे "उत्कृष्ट संसदपटु" पुरस्कार, प्रकाश जोशी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राजयोगी नेता पुरस्काराने सन्मानीत; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानीत.
यशदा, पुणे येथे अर्बन फायनान्सिंग विषयावर व्याख्याने दिली. ३१ ऑक्टोबर २०१४ ते २१ नोव्हेंबर, २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, २२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर, २०१९ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, डिसेंबर २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.
३० जून २०२२ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ, खाती - गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.
0 Response to "देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन"
Post a Comment