घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत सायकल रॅली उत्साहात घोषणा व गीतांनी दुमदुमले वाशिम
घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत सायकल रॅली उत्साहात
घोषणा व गीतांनी दुमदुमले वाशिम
एन.सी.सी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी दाखविली हिरवी झेंडी
वाशिम, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिन
१५ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. देशभर आनंदाचे वातावरण आहे. सन २०२२ पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा) अभियान सुरु आहे. या अभियानाचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरिकाला घरावर तिरंगा ध्वज लावण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज दि.९ ऑगस्ट रोजी वाशिम शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून काढण्यात आलेल्या या रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपजिल्हाधिकारी दादासाहेब दराडे, नितीन व्यवहारे ,जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस. ठोंबरे, तहसीलदार निलेश पळसकर, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांचेसह अन्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या रॅलीतून शहरातील मुख्य मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली.सायकल रॅलीमध्ये श्री. बाकलीवाल विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ लावा, वंदे मातरम, भारत माता की जय, यासह विविध देशभक्तीवर आधारित घोषणा तसेच रॅलीमध्ये ऐ मेरे वतन के लोगो, संदेसे आते है यासह विविध देशभक्तीवर आधारीत गीतांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. या घोषणा व देशभक्तीमय गीतांनी वाशिमचा परिसर दुमदुमुन गेला होता.
ही मोटार सायकल रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून सिव्हील लाईन मार्गे, बस स्टॅन्ड चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री शिवाजी विद्यालय, पाटणी चौक,अकोला नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय,नवीन नगर परिषद कार्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचली व जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्याहस्ते रॅलीला समारोप करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व रॅलीतील सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेल्फी पॉईंटला भेट देऊन सेल्फी काढला.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी संचालन करून सायकल रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.विधी अधिकारी महेश महामुनी, डॉ. महेंद्र चापे, डॉ.मोबीन खान, डॉ.विजय काळे, सुनील घोडे,एनसीसीचे शिक्षक अमोल काळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
#घरोघरीतिरंगा
#HarGharTiranga2024
0 Response to "घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत सायकल रॅली उत्साहात घोषणा व गीतांनी दुमदुमले वाशिम"
Post a Comment