स्वच्छ गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार आणि आर आर आबा सुंदर गाव पुरस्काराचे वितरण
साप्ताहिक सागर आदित्य
शाश्वत स्वच्छ गाव पुरस्काराची व्याप्ती वाढविणार: चंद्रकांत ठाकरे
शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार वितरण
जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार आणि आर आर आबा सुंदर गाव पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात करण्यात आले. यामध्ये वाशिम तालुक्यातील शेलु बुद्रुक या ग्रामपंचायतीने शाश्वत स्वच्छ गाव आणि आर आर आबा जिल्हा सुंदर गाव पुरस्कार या दोन्ही योजनांमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तिसरा क्रमांक पटकावून या स्पर्धेत आपली छाप पाडली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी, कारंजा पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख, मालेगाव पंचायत समितीच्या सभापती रंजना काळे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद बदरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी पांडुरंग ठोंबरे आणि सर्व गटविकास अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. वाशिम जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग महाराष्ट्रात प्रथम क्रंमांकावर आणल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी पांडुरंग ठोंबरे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
-----------------------------------------------
शाश्वत स्वच्छ गाव पुरस्काराची व्याप्ती वाढवणार: चंद्रकांत ठाकरे
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात येत असलेल्या शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार योजनेच्या पुरस्काराची रक्कम आणि व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली. शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि आर. आर. आबा सुंदर गाव योजनेच्या एकत्रित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या परिणामकारकतेवर प्रकाश टाकला. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा महाराष्ट्रात नंबर एक वर पोहोचली असल्याचे सांगून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात जिल्हा परिषदेने लक्ष्मी प्रगती गाठली आहे असे ते म्हणाले. जिल्ह्यामधील शाळा आणि अंगणवाड्या केवळ बोलक्या झाल्या नाहीत तर शिक्षणाचा दर्जाही उंचावला आहे. स्वच्छतेच्या क्षेत्रात जिल्हा आघाडीवर आहे तसेच कुपोषणाच्या बाबतीत जिल्हा जवळपास कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. गावामध्ये स्वच्छतेची कामे होत असून आता जिल्ह्यातील सर्व गावे मॉडेल म्हणून तयार होत आहेत. या गावांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार योजना आणली. यासाठी जिल्हा परिषदेच्या उपकारामधून 17 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली. येणाऱ्या काळातही ही योजना आणखी व्यापक करून त्याच्या पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिले.
------------------------------------------
शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार योजना राबविणारी महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेच्या उपकरातुन 17 लाख रुपायाची तरतुद करुन शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार योजना राबविणारी वाशिम ही एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. गावातील स्वच्छता कायम रहावी आणि गावांना स्वच्छतेबाबत गावांना प्रेरणा मिळावी म्हणुन जि प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ही नाविन्यपूर्ण योजना अंमलात आणली आहे.
यावेळी शाश्वत स्वच्छ गाव योजनेचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार शेलू बुद्रुक या गावाने पटकावला. तीन लाख रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन शेलु ग्राम पंचायतीचा गौरव करण्यात आला. मानोरा तालुक्यातील कोलार या गावाला दुसरा तर मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी या गावाने यामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. या गावांना अनुक्रमे दोन आणि एक लक्ष रुपायाचे रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तालुकास्तरावर शाश्वत स्वच्छ गावाचे पुरस्कार यावेळी घोषित करण्यात आले. वाशिम तालुक्यातून सेलू बुद्रुक, साखरा आणि जांभरून महाले यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय पुरस्कार देण्यात आला. मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोंदाडे, दुधाळा आणि वारंगी, रिसोड तालुक्यातील नेतनसा, कवठा आणि येवती, मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी, कासोळा आणि ईचा तसेच मानोरा तालुक्यातील कोलार, अजनी, इंदोरी आणि कारंजा तालुक्यातील विळेगाव, दोनद आणि बांबर्डा या गावांना अनुक्रमे प्रथम एक लाख, द्वितीय 50000 आणि तृतीय पुरस्कार 25000 रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
------------------------------------
आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण:
आर आर आबा सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आले. रिसोड तालुक्यातील गोभणी, कोठारी ता. (मंगरूळपीर) कोलार ता. (मानोरा) मेडशी (ता. मालेगाव) आणि कारंजा तालुक्यातील वाई या गावांना तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार मिळाला. वाशिम तालुक्यातील सेलू बुद्रुक या गावाने 50 लाख रुपये रोख रकमेचा जिल्हास्तरीय सुंदर गाव पुरस्कार पटकाविला. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे 2022-23 व 2023-24 यावर्षीच्या जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरणही जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सभापती सुरेश मापारी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन राम श्रृंगारे यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
--------------------------------------------------
0 Response to "स्वच्छ गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार आणि आर आर आबा सुंदर गाव पुरस्काराचे वितरण"
Post a Comment