महिन्याच्या तिसरा गुरुवार तक्रार निवारण दिवस! कक्ष स्थापन: जिल्हा परिषद सिईओसमक्ष समस्यांवर तोडगा
साप्ताहिक सागर आदित्य
महिन्याच्या तिसरा गुरुवार तक्रार निवारण दिवस!
कक्ष स्थापन: जिल्हा परिषद सिईओसमक्ष समस्यांवर तोडगा
लोकांच्या तक्रारीचा वेळेत निपटारा करण्यासाठी व त्यांच्या समस्यांवर योग्य तोडगा काढण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी जिल्हा परिषदेत तक्रार निवारण दिवस घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी काढले आहेत.
जिल्हा परिषदेकडे मिनी मंत्रालय म्हणुन पाहिले जाते. गाव आणि तालुका पातळीवर आपले काम झाले नाही म्हणुन लोक आपली तक्रार घेऊन मोठ्या अपेक्षेने मंत्रालय रुपी जिल्हा परिषदेत येतात. परंतु ज्यांच्याशी संबंधित तक्रार आहे ते साहेब कधी मिटींगमध्ये व्यस्त असतात तर कधी दौऱ्यावर. साहेब भेटले तर संबंधित कर्मचारी भेटतीलच याची खात्री नसते. अनेकवेळा महत्वाच्या बैठका सुरु असल्यामुळे लोकांना ताटकळत बसावे लागते. याध्ये लोकांचा वेळ व पैसा खर्च होतो. या पार्श्वभूमीवर सीईओ वाघमारे यांनी हा निर्णय घेतला आहे.
वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नव्याने रुजू झालेले वैभव वाघमारे यांनी पहिल्या दिवसापासुनच आपल्या लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभारामुळे वाशिमकरांवर आपली छाप पाडली आहे. महत्वाची बैठक असो… चर्चा, सुनावणी, लोकांची तक्रार… काहीही असो, त्यांच्या दालनाची दोन्ही दरवाजे सताड उघडीच असतात. अनेक वेळा लोक बैठका सुरू असतानाही तक्रार वा निवेदने घेऊन येतात.
दि. 20 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात एका महत्त्वाच्या विषयावर सुनावणी सुरू असताना काही ग्रामस्थ आपल्या गावातील तक्रार घेऊन आले होते. सीईओ वाघमारे यांनी सुरुवातीला त्यांना नंतर या म्हणुन परत पाठवले परंतु काही क्षणात त्यांना दालनात बोलवुन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. परंतु आलेल्या लोकांच्या समस्येचे काही कारणांमुळे संपूर्णपणे समाधान होऊ शकले नाही, ही बाब वाघमारे यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने सर्व विभाग प्रमुखांना आपल्या कक्षात बोलावून याबाबत चर्चा केली. आपला प्रस्ताव मांडला आणि जिल्हा परिषदेसाठी एक तक्रार निवारण दिवस ठरविण्यात आला. यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे यांना दिले. तसेच लोकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक महिन्यातील तिसरा गुरुवार हा दिवस निवडण्यात आला. या दिवशी फक्त लोकांच्या समस्या ऐकुन घेतल्या जातील आणि त्यावर उपाय योजना करण्यात येतील. यामध्ये टपालाद्वारे नियमित येणाऱ्या तक्रारीसह प्रत्यक्ष लोकांनी आणलेल्या तक्रारीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व विभाग प्रमुख आणि तक्रारीशी संबंधित असलेले इतर कर्मचारी हे एकत्र बसून समोरासमोर त्या समस्येवर समाधान शोधतील. प्रसंगानुरुप तक्रारीचे समाधान तात्काळ करण्यात येईल परंतु जर एखादी समस्या जर तात्काळ सोडवता येणे शक्य नसल्यास संबंधित तक्रारकर्त्यास आवश्यकतेनुसार पुढच्या गुरुवारी बोलवण्यात येईल.
“लोकांनी मोजक्या आणि स्पष्ठ शब्दात, लेखी स्वरुपात आपली तक्रार नोंदवावी. मुख्य तक्रारीसोबत, तक्रारीच्या अनुषंगाने इतर तपशिल जोडले तेरी चालतील. मात्र तक्रार ही जास्तीत जास्त 10 वाक्यात असावी. एकावेळी एकाच विषयाची तक्रार स्विकारली जाईल. लोकांनी विणाकारण अथवा चुकीच्या उद्देशाने, खोटी तक्रार करुन शासनाचा वेळ वाया घालवु नये.“
-वैभव वाघमारे,(भाप्रसे)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
0 Response to "महिन्याच्या तिसरा गुरुवार तक्रार निवारण दिवस! कक्ष स्थापन: जिल्हा परिषद सिईओसमक्ष समस्यांवर तोडगा"
Post a Comment