
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून घरबसल्या मिळवा हवे ते दाखले! जिल्हा परिषद मूख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन!
साप्ताहिक सागर आदित्य
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून घरबसल्या मिळवा हवे ते दाखले!
जिल्हा परिषद मूख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन!
ग्रामपंचायतीमधील जवळ पास सर्वच कामे आता ऑनलाईन प्रणाली च्या माध्यमातून होत आहेत. यामध्ये महत्वाचा दुवा म्हणून आपले सरकार सेवा केंद्र अत्यंत तत्परतेने मोलाचे योगदान देत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
दरम्यान नागरिकांनी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून घरबसल्या हवे ते दाखले प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जात आहे. दैनंदित जीवनात तंत्रज्ञानाच्या मदतीने कामाला गती प्राप्त झालेली आहे. यानुसारच ग्रामीण भागातील व्यवहाराला तंत्रज्ञानाची साथ मिळाल्याने कामे झपाट्याने होत आहेत. ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये 'आपले सरकार' सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्या माध्यमातून ऑनलाईन कामे करण्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्रात कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे शासनास आवश्यक असलेली सर्व कामे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व सेवा तत्परतेने मिळत आहेत.
पंधराव्या वित्तआयोगाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झालेला आहे. ई-ग्रामस्वराज या ऑनलाईन प्रणाली द्वारे ग्रामीण भागातील सर्व विकासकामे एका क्लिक वर होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व विकास कामाला गती प्राप्त झाली असल्याचे दिसून येत आहे. याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
नागरिकांना आवश्यक असलेले दाखले घरबसल्या मिळवण्याची सुविधा सिटीझन कनेक्ट मोबाईल अॅप च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील एकूण २२११७ नागरिकांनी सिटीझन कनेक्ट अॅप इंस्टाॅल केलेले असून १७७९ व्यवहार केले असल्याची माहिती पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी दिगंबर लोखंडे यांनी दिली. घरबसल्या सेवा मिळवण्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी सिटीझन कनेक्ट हे अॅप इंस्टाल करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. *सिटिझन कनेक्ट अॅॅप च्या माध्यमातून पुढील प्रमाणे सेवा उपलब्ध आहेत:
जन्म नोंदीचा दाखला, मृत्यू नोंदीचा दाखला, विवाह नोंदीचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, असेसमेंट उतारा, विवाह नोंदणी अर्ज, कर भरणा
तसेच महा ई-ग्राम प्रणाली च्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे सर्व रजिस्टर (नमुना १ ते ३३) ऑनलाईन केले जात आहेत. सर्व प्रकारचे दाखले ऑनलाईन दिले जात आहेत. या प्रणाली च्या माध्यमातून आजपर्यंत एकूण २४१६६ ऑनलाईन दाखले वितरीत करण्यात आलेले आहेत. तसेच केंद्रशासनाच्या सर्विस प्लस ऑनलाईन पोर्टल च्या माध्यमातून चालू वर्षात १४५८८ ऑनलाईन सेवांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना मिळाला असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी कळविले आहे.
सर्व प्रकारचा कर भरणा सुलभ होण्याच्या दृष्टीने सर्व ग्रामपंचायती मध्ये क्युआर कोड (QR Code) प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती मध्ये तात्काळ QR कोड उपलब्ध करून घेण्याच्या सुचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत सर्वच कामे ऑनलाईन होत असल्याने कामाला गती प्राप्त झालेली आहे आणि कामामध्ये पारदर्शकता निर्माण होत आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल आपुलकीची भावना निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
0 Response to "आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून घरबसल्या मिळवा हवे ते दाखले! जिल्हा परिषद मूख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन!"
Post a Comment