-->

शहवासींनी वाढीव कर का भरावा ?

शहवासींनी वाढीव कर का भरावा ?

  


साप्ताहिक सागर आदित्य 

शहवासींनी वाढीव कर का भरावा ?


विकासाच्या नावाखाली शहर भकास : ‘आप’कडून निवेदनाद्वारे वाढीव कर रद्द करण्याची मागणी


वाशिम – वाशिम नगर परिषदेने विकासाच्या नावाखाली शहर भकास केले असून, त्यात भरीस भर म्हणून आता वाढीव कर लादल्या जात आहे. त्यामुळे शहरात कुठली विकासात्मक कामे झाली, म्हणून शहरवासींनी वाढीव कर भरावा? असा प्रश्न जनतेला पडला असून, नगर परिषद प्रशासनाने वाढीव कर रद्द करून जुन्या कर पद्धतीप्रमाणेच कराची आकारणी करावी, अशी मागणी आज ‘आप’चे जिल्हापदाधिकारी राम पाटील डोरले यंनी निवेदनाद्वारे केली आहे. 

‘आप’च्यावतीने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, वाशिम नगर पालिकेने शहराला विकासाच्या नावाखाली भकास करून ठेवले आहे. शहराच्या कुठल्याच भागात विनाव्यत्यय दुचाकी वाहन घेऊन जाता येत नाही. जागोजागी खोदून ठेवल्यामुळे अपूर्णावस्थेतील सिमेंट रस्त्यांमुळे अपघात होत आहे. रस्ता अपूर्णत्वामुळे झालेल्या अपघातात कुणी दगावल्यास न. प. प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? 

शहरात रात्रीच्यावेळी भूमिगत गटार योजनेचे चेंबर अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रात्रीच्यावेळी मुख्य रहदारीच्या मार्गावरही पथदिवे बंद असतात, शहरवासीयांना १० ते १५ दिवसाआड मिळणारे दूषित पाणी, नगर पालिकेच्या खुल्या जागेवर वाढलेले गवत, झाडे-झुडपे, ओपन जीमला तारकुंपने न मिळाल्यामुळे चोरीस गेलेले व्यायामाचे साहित्य, जागोजागी साचलेले घाण पाणी त्यामुळे पसरणारी रोगराई, जुन्या शहरात कचऱ्याने तुंबलेल्या नाल्या, शहरात धनदांडग्यांनी केलेले पक्के अतिक्रमण काढण्यास कुचरणारी नगर परिषद, गुंठेवारी खरेदी प्रक्रियेच्या नावाखाली नगर परिषदेने गोर-गरिब भूखंडधारकांचे प्रस्ताव जमा करून घेतले. मात्र, त्यानंतर नगर परिषदेने हजारो भूखंडधारकांना केवळ आशेच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवले आहे. 

वाशिम नगर परिषद मालमत्ताधारकांना कुठलीच सुविधा देण्यात यशस्वी झालेलो नाही, तरी सुद्धा मालमत्ताधारकांवर वाढीव कराचा भार कशासाठी लादायचा?  तरी आपण वाढीव कराला (टॅक्स) स्थगिती देऊन, पूर्वी प्रमाणेच कराची (टॅक्स) आकारणी करीत, मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा, अन्यथा आपच्यावतीने दि. ३० ऑक्टोबर २०२३ पासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी यांना माहितीस्तव देण्यात आली आहे. 

........

कचरा संकलनातून लाखोंचा चुना!

कचरा संकलनाच्या नावाखाली नगर परिषदेच्या हक्काच्या घंटागाड्या भरपावसात सडवत ठेवत, ट्रॅक्टरद्वारे अल्पमुदतीच्या निवीदा काढून दर महिन्याला लाखो रुपयांचा चुना लावला. त्यानंतरही ठिकठिकाणी कचऱ्याचे ठिग साचून सुटणाऱ्या दुर्गंधीने नागरिकांचे जगणे असह्य करून ठेवले आहे. तारांगणाला लागलेली आग, टेम्पल गार्डनच्या कामात झालेला भ्रष्टाचार, लोकार्पणाच्या प्रतिक्षेत असलेले नाट्यगृह आदींमध्ये नगर परिषद कुठे परिपूर्ण आहे? हे नगर परिषद प्रशासनाने स्वतःला विचारायला हवे, मगच कर वाढ करायला हवी.

.....

भ्रष्टाचाऱ्यांचे खिसे भरत नसल्यानेतर वाढीव कर नाही ना?

नागरीकांनी आपल्या घामाच्या पैशातून वाशिम नगर परिषदेकडे कर जमा करायचा, व याच कराच्या पैशाचे नगर परिषदेतील भ्रष्टाचारी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी लचके तोडायचे. त्यामुळे नियमीत मिळणाऱ्या करातून भ्रष्टाचाऱ्यांचे खिसे भरत नसल्यामुळे शहरातील मालमत्ताधारकांच्या डोक्यावर वाढीव कर तर लादल्या जात नाही ना? असा प्रश्न आता शहरातील नागरिक विचारत असल्याची बाब निवेदनाद्वारे नमूद करण्यात आली आहे.  


0 Response to "शहवासींनी वाढीव कर का भरावा ?"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article