
जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये हात धुवा दिन साजरा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचा उपक्रम
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये हात धुवा दिन साजरा
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचा उपक्रम
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी , आशा, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही आणि जलसुरक्षक तसेच शाळेतील मुले यांच्या सहभागाने गावामध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. काही शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांनी हाताच्या आकारामध्ये आकर्षक डस्टबिन आणि स्वच्छतेचे संदेश रंगविण्यात आले होते. कोंडाळा झांबरे, लाठी, सनगाव, टाकळी, कोळगाव, डही, वनोजा, कोयाळी, केशवनगर या ग्राम पंचायतीमधील शाळेमध्ये गीताच्या माध्यमातुन हात धुण्याच्या स्टेप्स सांगुन त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते.
संपुर्ण जगात दिनांक 15 ऑक्टोबर हा हात धुवा दिवस साजरा करण्यात येत असून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हात धुवा दिन साजरा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले होते.
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे संचालक किरण कोवे आणि पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या. या टीमच्या सदस्यांनी सहा तालुक्यातील निवडक ग्राम पंचायतींना भेटी देऊन जागतिक हात धुवा दिन साजरा केला. तसेच काही गावात गृहभेटी देऊन हात धुण्याच्या पध्दतीबाबत माहिती दिली. तसेच हाताची स्वच्छता व आरोग्य याबाबत सामाजिक माध्यमांवरुन जनजागृती करण्यात आली.
या पथकामध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सहाय्पक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने, जिल्हा सल्लागार प्रफुल्ल काळे, राम श्रृंगारे, शंकर आंबेकर, सुमेर चाणेकर, प्रदिप सावळकर, अमित घुले, यांचा तसेच पंचायत समिती स्तरावरील गट समन्वयक गजानन भोयर, सुखदेव पडघान, अभिजित गावंडे, मनोज रोकडे यांचा समावेश होता.
0 Response to "जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये हात धुवा दिन साजरा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचा उपक्रम"
Post a Comment