शहरात भिक्षेकरी आढळल्यास चाईल्ड लाईनच्या 1098 क्रमांकावर संपर्क साधा
साप्ताहिक सागर आदित्य
शहरात भिक्षेकरी आढळल्यास
चाईल्ड लाईनच्या 1098 क्रमांकावर संपर्क साधा
वाशिम, : मिशन वात्सल्य समितीअंतर्गत आज २९ जुलै रोजी तहसीलदार तथा अध्यक्ष, मिशन वात्सल्य समिती, वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली भिक्षेकरी सर्वेक्षण मोहीमेबाबत समितीची सभा संपन्न झाली. या सभेत वाशिम तालुक्यात भिक्षेकरी सर्वेक्षण मोहीम राबवून सापडलेल्या भिक्षेकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्याबाबत तहसीलदार राजेश वझीरे यांनी यावेळी सूचना दिल्या.
सभेला गट विकास अधिकारी प्रमोद बदरखे, बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा सदस्य सचिव मिशन वात्सल्य समिती प्रियांका गवळी, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे, बाल कल्याण समितीचे सदस्य विनोद पट्टेबहादूर, बाल कल्याण समितीचे सदस्य बालाजी गंगावणे, डॉ. मंजुश्री जांभरूणकर, अॅड. अनिल उंडाळ, संत गाडगे बाबा बहुउद्देशीय संस्थेच्या प्रतिनिधी योगिता जाधव, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, चाईल्ड लाईनचे समन्वयक शाहीद खान, टिम मेंबर अविनाश सोनोने, अविनाश चौधरी, गोपीशंकर आरु, शिवांगी गिरी, निकिता ढोके व अंगणवाडी सेविका वैशाली बुंधे यांची उपस्थिती होती.
वाशिम शहरात भिक्षेकरी सर्वेक्षण मोहीम बसस्थानक, पाटणी चौक, रेल्वे स्टेशन, बालाजी मंदिर, शनी मंदिर, गुरुवार बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली नाका, पुसद नाका, अकोला नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय या सार्वजनिक गर्दीच्या व प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी बाल भिक्षेकरी व महिला, पुरुष भिक्षेकरी यांचा शोध घेण्यात आला. भिक्षेकरी सर्वेक्षण मोहीमेअंतर्गत एकूण १४ पैकी १० भिक्षेकरी व ४ बाल भिक्षेकरी भिक्षा मागतांना आढळून आले. त्यांच्याकडून भिक्षा न मागण्याबावत हमीपत्र लिहून घेण्यात आले. या मोहिमेअंतर्गत सापडलेल्या ४ बाल भिक्षेकरींना बाल कल्याण समिती, वाशिम यांच्यापुढे उपस्थित करण्यात आले. भिक्षेकऱ्यांच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. ४ बाल भिक्षेकरी बालकांपैकी एका बालिकेला बाल कल्याण समितीअंतर्गत बाल संगोपन योजनेचा लाभ तात्काळ मंजूर करण्यात आला. उर्वरित ३ बालकांची कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
तहसील कार्यालयाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, रेशनकार्ड, मतदानकार्ड व ईतर शासकीय योजनांचा लाभ भिक्षेकरी यांना मिळवून देण्यात येईल. भिक्षेकरी सर्वेक्षण मोहिमेत बाल कल्याण समिती, बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण व शहरी), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नगर पालिका कार्यालय, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईन, संत गाडगे बाबा बहुदेशीय संस्था इत्यादी कार्यालयाच्या समन्वयाने भिक्षेकरी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. शहरामध्ये बाल भिक्षेकरी आढळल्यास १०९८ या चाईल्ड लाईनच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी केले आहे.
.




0 Response to "शहरात भिक्षेकरी आढळल्यास चाईल्ड लाईनच्या 1098 क्रमांकावर संपर्क साधा"
Post a Comment