जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला मिळत आहे चालना
साप्ताहिक सागर आदित्य/
जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला मिळत आहे चालना
· मासेमारीसाठी 7999 हेक्टर जलक्षेत्र उपलब्ध
· 5117 सभासद करतात मासेमारी
· 1200 किलो अनुदानाचे जाळे वितरीत
· मासे विक्रीसाठी 5 फिरते वाहने वाटप
वाशिम - जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. बहूतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून केली जाते. जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या मालकीची तलाव आहेत. याच तलावाच्या माध्यमातून पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणारे मासेमार बांधव मत्स्य व्यवसाय विभागाच्या मार्गदर्शनात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या माध्यमातून स्थापना करुन मत्स्य शेती करीत आहेत. राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या विविध योजना आणि केंद्र शासनाची निलक्रांती व प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळत आहे.
मासेमारी करणाऱ्या 153 मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था जिल्ह्यात कार्यरत आहे. यामध्ये एकूण 5117 मच्छीमार सभासद आहेत. जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाचे 139 तलाव असून या तलावांचे जलक्षेत्र 6959 हेक्टर तर जिल्हा परिषदेच्या मालकीचे 204 तलाव आहे. या तलावाचे जलक्षेत्र 1040.62 हेक्टर आहे. जिल्ह्यातील 343 तलावांच्या 7999 हेक्टर जलक्षेत्रातून मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांनी सन 2021-22 या वर्षात 5552 मेट्रीक टन मत्स्योत्पादन घेतले.
जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय सहकारी संस्था ह्या राहू, कतला, आणि सायप्रिनसला माशांचे उत्पादन घेतात. तलावात मासे संगोपनासाठी मत्स्यजीरे आणि बोटुकलीची खरेदी ह्या संस्था पुसद तालुक्यातील इसापूर प्रकल्प, अकोला जिल्ह्यातील महान आणि काटेपुर्णा प्रकल्पातून करतात. पावसाळ्यात जुलै महिन्यात मत्स्यजीरे तर बोटुकली ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये या संस्थांना तलावात सोडण्यासाठी उपलब्ध होतात.
काही संस्था ह्या छत्तीसगड राज्यातून मत्स्यजीऱ्यांची खरेदी करतात. 1 हजार रुपये याप्रमाणे 8 ते 10 लाख मत्स्यजीऱ्यांची खरेदी करतात. जिल्ह्यातील सर्व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना जवळपास 165 लाख् बोटुकली मत्स्यशेतीसाठी लागते.ऑगस्ट महिन्यात बोटुकली पाण्यात सोडल्यानंतर तेथून आठ ते दहा महिन्यात 1 किलोचा मासा विक्रीला तयार होतो.1 लाख मत्स्यजीऱ्यातून जवळपास 12 हजाराच्या वर मासे तयार होतात. माशांना खाद्य म्हणून गव्हाचा, मकयाचा व तांदूळाचा कोंडा तलावात टाकतात. 60 ते 80 रुपये प्रति किलो याप्रमाणे व्यापाऱ्यांना ह्या संस्था जागेवरुनच विक्री करतात. खरेदीसाठी व्यापारी अकोट, मुर्तीजापूर व यवतमाळ येथून येतात. तलावात जाळ्याच्या माध्यमातून मासे पकडणाऱ्या व्यक्तींला प्रति किलो 30 रुपये याप्रमाणे मजुरी देण्यात येते.
जिल्ह्यातील मत्स्य शेतीला चालना मिळवी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सर्वसाधारण, विशेष घटक योजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना राबविण्यात येतात. त्या अंतर्गत मच्छीमार संस्थांना तसेच त्यांच्या सभासदांना नायलॉन सुत जाळे व होडया आदी साधने खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. सन 2021-22 या वर्षात सर्वसाधारण योजनेअंतर्गत 17 संस्थाच्या 460 सभासदांना 4 लक्ष 60 हजार रुपये किमतीचे जाळ्यांवर अनुदान देण्यात आले. विशेष घटक योजनेतून 3 संस्थांच्या 100 सभासदांना एक लक्ष रुपये किमतीचे 500 किलो जाळे अनुदानातून देण्यात आले.
विदर्भ पॅकजमधून सन 2002-2003 या वर्षात 50 सायकल शितपेटया देण्यात आल्या. शेतकरी आत्महत्यग्रस्त जिल्हा म्हणुन सन 2019 मासे विक्रीसाठी 5 फिरती वाहने देण्यात आली. यामध्ये शेतकरी मत्स्य व्यवसाय गट, कारखेडा ता.मानोरा स्वरांगी शेतकरी गट कळंबेश्वर ता.मालेगाव, युसुफाखॉ शेतकरी गट कारंजा,मुंगसाजी शेतकरी गट धारप्रिंप्री ता.मालेगाव,शिवगंगा शेतकरी गट वाशिम यांचा समावेश आहे. निलक्रांती योजनेंतर्गत मानोरा तालुक्यातील सुबोध डाहाणे यांनी मत्स्यतळी बांधकामासाठी 1 लक्ष 93 हजार रुपये अनुदान, वाशिम तालुक्यातील विशाल सोमटकर यांना मत्स्यखाद्य कारखाना तयार करण्यासाठी 4 लक्ष रूपये अनुदान व मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील गणेश मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला नवीन बोटी व जाळी खरेदी करण्यासाठी 40 लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
मासेमारी बांधवांना मासेमारी करतांना विविध बाबींसाठी खेळते भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी 283 मासेमारी सभासदांना किसान क्रेडीट कार्ड मिळण्यासाठी बँकाकडे प्रस्ताव सादर केले आहे. सन 2020-21 या वर्षात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत 74 लक्ष 75 हजार आणि 2021-22 या वर्षाचा 2 कोटी 3 लक्ष रुपयांचा कृती आराखडा मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाला पाठविला आहे.नवीन मत्स्यतळी खोदकाम,निवीष्ठा अनुदान,मत्स्यबीज संगोपन तलाव, शितपेटीसह ई-रिक्षा जलाशयातील मत्स्य बोटकुली संचयन,भूजलाशयीन बॉयोप्लॉक उभारणी प्रकल्प ,की ऑक्स,नवीन मत्स्यतळी खोदकाम,मत्स्यखाद्य निर्मिती कारखाना,पिंजरा उभारणीप्रकल्प, रेफ्रीजरेटर वाहन आदी बाबींसाठी सन 2020-21 या वर्षात 7 लाभार्थ्यांना व एका मत्स्य सहकारी संस्थेला तर सन 2021-22 या वर्षांत 11 लाभार्थ्यांना आणि एका संस्थेला निधी प्राप्त झाला आहे.
वाशिमसारख्या छोटया आणि मागास म्हणुन आकांक्षीत जिल्ह्यात पारंपारीक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मासेमार बांधवांचे या व्यवसायातून जीवनमान उंचावावे यासाठी राज्य सरकारच्या योजनेसह निलक्रांती व प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची अंमलबजावणी मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात येत आहे.
0 Response to "जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला मिळत आहे चालना"
Post a Comment