१० हेक्टरपर्यंतच्या तलावांचे होणार पुनरुज्जीवन ग्रामपंचायत व शेतकरी समुहांकडून अर्ज मागविले
साप्ताहिक सागर आदित्य/
१० हेक्टरपर्यंतच्या तलावांचे होणार पुनरुज्जीवन ग्रामपंचायत व शेतकरी समुहांकडून अर्ज मागविले
वाशिम - जिल्हयातील तलाव आणि बांधातील पाणी साठयाचे पुनरुज्जीवन करण्याची योजना राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या निती आयोगाने घेतला आहे. देशातील १० जिल्हयात प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये वाशिम जिल्हयाचा समावेश करण्यात आला आहे. १० हेक्टरपर्यंतच्या बांध/तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ग्रामपंचायत व शेतकरी समुहांकडून तातडीने परिपुर्ण अर्ज मागविले आहे. पाणी साठयाचे पुनरुज्जीवन करण्याकरीता खोदकामासाठी लागणारे जेसीबी/पाकलेन मशीन हया जिल्हा प्रशासनामार्फत शासकीय पध्दतीने डिझेलसह भाडयाने घेण्यात येणार आहे. त्याकरीता लागणारा निधी हा निती आयोग देणार आहे. जलसाठयांचे पुनरुज्जीवन कार्यक्रमाची आखणी ही शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मागणीवर अवलंबून राहील. ज्या गावामध्ये तलावांचे/बांधाचे पुनरुज्जीवन करावयाचे आहे, अशा ग्रामपंचायत/ शेतकरी/ गटांकडून/ शेतकरी समुहांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी तलाव/ बांध हा शुन्य ते १० हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. अर्जासोबत ज्या तलावातून/बांधातून गाळ उचलणार आहे, अशा तलावाचे/बांधाचे ठिकाण, शेतकऱ्यांच्या शेत गट नंबरसह माहिती, गावात उपलब्ध असलेले ट्रॅक्टर व त्याचा क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती नमुद करुन स्वाक्षरीसह मागणी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथील रोजगार हमी योजना शाखेत जमा करावे.
मागणी अर्जामध्ये सरपंचाच्या नेतृत्वाखाली या कामासाठी पाच व्यक्तींची टास्क फोर्स बनविण्याची तयारी, तलावाचे काम सुरु असतांना त्यावर पुर्ण देखरेख ठेवण्यासाठी स्वयंसेवकाची नियुक्ती या बाबीसह अर्ज देणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जातून उपलब्ध असलेले जेसीबी/ पोकलेन मशीन गावांची आवश्यकता लक्षात घेवून ग्रामपंचायतींचा प्राधान्यक्रम हा जिल्हास्तरावर तर गावाचा प्राधान्यक्रम हा तहसिलस्तरावर आणि राष्ट्रीय सुचना व विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
पाणी साठयाचे पुनरुज्जीवन करण्याच्या या विशेष योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शिवारात पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्यामुळे या योजनेचा लाभ जिल्हयातील जास्त ग्रामपंचायतींनी, शेतकऱ्यांनी, शेतकरी गटानी व शेतकरी समुहांनी घ्यावा. यासाठी तलाव/ बांधाचे पुनरुज्जीवन करण्याच्या मागणीचे अर्ज तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या शाखेत दयावे. असे उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांनी कळविले आहे.
0 Response to "१० हेक्टरपर्यंतच्या तलावांचे होणार पुनरुज्जीवन ग्रामपंचायत व शेतकरी समुहांकडून अर्ज मागविले"
Post a Comment