पोषण ही केवळ आरोग्याची बाब नसून निरोगी, सक्षम आणि सुदृढ समाजाच्या निर्मितीचा पाया आहे
साप्ताहिक सागर आदित्य
राष्ट्रीय पोषण महिना
(१ ते ३० सप्टेंबर)
सुदृढ समाजासाठी पोषणाचा संदेश
जनजागृतीपासून कृतीपर्यंतचा सामूहिक संकल्प
पोषण ही केवळ आरोग्याची बाब नसून निरोगी, सक्षम आणि सुदृढ समाजाच्या निर्मितीचा पाया आहे. बालकांचा सर्वांगीण विकास, किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य, गर्भवती व स्तनदा मातांची योग्य काळजी आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला संतुलित आहार मिळणे, यासाठी पोषणाबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने दरवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला जातो.
पोषण अभियानाच्या माध्यमातून पोषणाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. अंगणवाडी केंद्रे, शाळा, आरोग्य संस्था तसेच ग्रामपातळीवर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांना संतुलित आहार, योग्य आहारपद्धती, स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले जाते.
पहिल्या १,००० दिवसांना विशेष महत्त्व
बालकाच्या जन्मापूर्वीपासून ते दोन वर्षांपर्यंतचा कालावधी हा त्याच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे गर्भधारणेपासून बालकाच्या पहिल्या दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीत मातेला आणि बालकाला योग्य पोषण मिळणे गरजेचे आहे.
गर्भवती मातांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आवश्यक पोषणपूरक घटक घ्यावेत आणि सकस व संतुलित आहार घ्यावा. बालकाच्या जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान आणि त्यानंतर वयानुसार पूरक आहार देणे बालकाच्या निरोगी वाढीसाठी महत्त्वाचे आहे.
स्थानिक अन्नपदार्थांतून पोषणाची समृद्धी
पोषणासाठी महागडे किंवा विशेष पदार्थच आवश्यक असतात, असा समज दूर करणेही गरजेचे आहे. आपल्या परिसरात सहज उपलब्ध होणारी डाळी, कडधान्ये, तृणधान्ये, हिरव्या पालेभाज्या, विविध भाज्या, फळे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक पदार्थ यांचा आहारात योग्य समावेश करता येतो.
आहारात विविधता ठेवणे, ऋतुनुसार उपलब्ध फळे व भाज्यांचा वापर करणे आणि पारंपरिक पौष्टिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे, हा पोषण सुधारण्याचा प्रभावी मार्ग आहे.
कुपोषणाविरोधात जनजागृती
कुपोषणाचे परिणाम केवळ बालकाच्या वाढीपुरते मर्यादित राहत नाहीत. त्याचा परिणाम शारीरिक वाढ, बौद्धिक विकास, रोगप्रतिकारक क्षमता आणि भविष्यातील आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे बालकांचे नियमित वजन व उंची मोजणे, वाढीचे निरीक्षण करणे आणि गरजेनुसार वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.
पोषण अभियानांतर्गत कुपोषणाची कारणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि उपलब्ध शासकीय सेवांबाबत जनजागृती करण्यात येते. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, महिला बचत गट आणि ग्रामपातळीवरील विविध यंत्रणांचा या अभियानात महत्त्वाचा सहभाग असतो.
पोषणाबरोबर स्वच्छतेलाही महत्त्व
चांगला आहार आणि स्वच्छता यांचा जवळचा संबंध आहे. हात स्वच्छ धुणे, स्वच्छ पाणी पिणे, अन्नपदार्थ झाकून ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे यामुळे अनेक आजारांपासून बचाव करता येतो.
त्यामुळे पोषण महिना हा केवळ आहाराविषयी माहिती देण्याचा उपक्रम न राहता पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैली यांचा समन्वित संदेश देणारे अभियान ठरते.
महिलांचा सहभाग ठरतो महत्त्वाचा
कुटुंबाच्या आहारविषयक सवयी घडविण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असते. महिलांचे आरोग्य आणि पोषण चांगले असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यावर होतो. किशोरवयीन मुली, गर्भवती आणि स्तनदा मातांना पोषणविषयक योग्य माहिती देणे, त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे आणि आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही सामूहिक जबाबदारी आहे.
विविध उपक्रमांतून पोषणाचा संदेश
राष्ट्रीय पोषण महिन्याच्या कालावधीत पोषण जनजागृती रॅली, पोषण शपथ, पाककृती प्रदर्शन, पोषणविषयक मार्गदर्शन, अंगणवाडी स्तरावरील उपक्रम, शालेय जनजागृती कार्यक्रम, आरोग्य तपासणी, वाढ निरीक्षण, महिला व किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन, स्थानिक पौष्टिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन आणि विविध स्पर्धांचे आयोजन करता येते.
या उपक्रमांमुळे पोषणाचा संदेश केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता तो घराघरात आणि समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
‘पोषण’ ही प्रत्येकाची जबाबदारी
निरोगी बालक म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी कुटुंब म्हणजे सक्षम समाज. त्यामुळे पोषणाचा विषय केवळ एका विभागाची किंवा यंत्रणेची जबाबदारी नसून प्रत्येक कुटुंब, समाज आणि नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.
राष्ट्रीय पोषण महिन्याच्या निमित्ताने योग्य आहार, नियमित आरोग्य तपासणी, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्याचा संकल्प करूया. आपल्या घरातील प्रत्येक बालक, महिला आणि नागरिक सुदृढ राहण्यासाठी पोषणाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया.
“संतुलित आहार, निरोगी जीवन; पोषणातून घडवूया सशक्त समाज!”
संकलन :
अनिल कुरकुटे,
जिल्हा माहिती कार्यालय,
वाशिम.
0 Response to "पोषण ही केवळ आरोग्याची बाब नसून निरोगी, सक्षम आणि सुदृढ समाजाच्या निर्मितीचा पाया आहे"
Post a Comment