-->

शेतकरी, बीजोत्पादकांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जैविक उत्पादने व रब्बी हंगामातील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन

शेतकरी, बीजोत्पादकांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जैविक उत्पादने व रब्बी हंगामातील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

🌾 महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाशिममध्ये जनसंवाद कार्यक्रम उत्साहात


🌱 शेतकरी, बीजोत्पादकांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जैविक उत्पादने व रब्बी हंगामातील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन


📍 वाशिम,  : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाबीज जिल्हा कार्यालय, वाशिम येथे जनसंवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील भागधारक, शेतकरी, बीजोत्पादक व विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


🌾 कार्यक्रमस्थळी महाबीज प्रमाणित ज्वारी, करडई, मोहरी, हरभरा या बियाण्यांसह रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पी.एस.बी., के.एम.बी., महाजैविक ही जैविक खते, ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक, कर्बमापक किट, निमास्त्र अतिसूक्ष्म निंबोळी पावडर, महास्पीड रॅपिड डिकंपोझर तसेच ताग व ढेंच्या या हिरवळीच्या खतांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या उत्पादनांची व विविध वाणांची माहिती देण्यासोबतच त्यांची विक्रीही करण्यात आली.


👨‍🌾 कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी संशोधन केंद्र, प. दे. कृ. वि., वाशिमचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ भरत दशरथ गिते उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी, बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला येथील गणेश मार्गे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सागर सावरकर, कृषी अधिकारी जी.आर. फटांगळे, प्रशांत घनमोडे, महाराष्ट्र कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तथा महाबीज भागधारक राधेश्यामजी मंत्री, महाबीजचे माजी विभागीय व्यवस्थापक सखारामजी वाळले, वरिष्ठ केंद्र अभियंता सतीश सोनुले आणि शेतकरी प्रतिनिधी रामकिशन अवचार उपस्थित होते.


📌 प्रास्ताविकात एस.एस. सावरकर यांनी जनसंवाद कार्यक्रमाचा उद्देश, महाबीजची स्थापना, आजपर्यंतचा यशस्वी प्रवास आणि नवीन उत्पादनांची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी महाबीजच्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.


🌱 सखारामजी वाळले यांनी महाबीजच्या विविध बियाणे व जैविक उत्पादनांबाबत गौरवोद्गार काढले. राधेश्यामजी मंत्री यांनी बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. गणेश मार्गे यांनी बीजप्रक्रिया आणि प्रमाणित बियाण्यांच्या वापराचे महत्त्व विशद केले, तर सतीश सोनुले यांनी महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमासह जैविक उत्पादनांच्या वापराबाबत माहिती दिली.


🌾 अध्यक्षीय मार्गदर्शनात भरत दशरथ गिते यांनी उपस्थित बीजोत्पादक शेतकऱ्यांना तूर, मूग, उडीद व सोयाबीन उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना, कीड नियंत्रण आणि जैविक उत्पादनांच्या वापराचे महत्त्व सांगितले. आगामी रब्बी हंगामातील पेरणी करताना घ्यावयाची काळजी तसेच नवीन कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढ साधण्याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.


🎤 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाबीज, वाशिमचे लेखापाल डी.आर. डफळे यांनी केले, तर आभार कृषी क्षेत्र अधिकारी जे.एम. चव्हाण यांनी मानले.


🌱 तालुकास्तरावरून सतीश गाडे (सवड), प्रदीप गवळी (एकंबा), वासुदेव आव्हाळे (सायखेडा) यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी पुढाकार घेतला.


#महाबीज #सुवर्णमहोत्सवीवर्ष #जनसंवाद #शेतकरी #बीजोत्पादक #कृषीतंत्रज्ञान #जैविकउत्पादने #रब्बीहंगाम #बियाणे #कृषीजनजागृती #वाशिम

0 Response to "शेतकरी, बीजोत्पादकांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जैविक उत्पादने व रब्बी हंगामातील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article