17 पासुन स्वच्छता ही सेवा अभियान: स्वच्छ व विकसित भारताच्या उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा: मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान
साप्ताहिक सागर आदित्य
17 पासुन स्वच्छता ही सेवा अभियान:
स्वच्छ व विकसित भारताच्या उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा:
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान
जिल्ह्यात 17 सप्टेंबर पासुन २ ऑक्टोबर म. गांधी जयंती पर्यंत "स्वच्छता ही सेवा" हे अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छ व विकसित भारताच्या उभारणीसाठी केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नाहीत, तर गावागावांतील प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्पित चौहान (भाप्रसे) यांनी केले असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना हे अभियान लोकचळवळ म्हणून राबविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
"स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत" ही या वर्षीच्या अभियानाची संकल्पना असुन या दरम्यान गावोगावी अस्वच्छ व अडचणीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्यांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी, शाळा-महाविद्यालयांतील स्वच्छता ज्ञानयात्रा, सफाईमित्र व स्वच्छता कामगारांसाठी आरोग्य तपासणी व सन्मान शिबिरे, वृक्षारोपण, कचरा वर्गीकरणाबाबत घरोघरी जनजागृती तसेच "वेस्ट टू वेल्थ" व "वेस्ट टू आर्ट" यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांचे विशेष आवाहन:
सीईओ श्री चौहान यांनी जिल्ह्यातील खालील घटकांना या अभियानात हिरिरीने सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे -
सरपंच, सचिव आणि उपसरपंच यांनी आपापल्या ग्रामपंचायत क्षेत्रात नियोजनबद्ध कृती आराखडा राबवून गावाचे नेतृत्व करावे. लोकांना या अभियानात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे.
स्वच्छाग्रही व स्वच्छता दूतांनी घराघरांत पोहोचून कचरा वर्गीकरण व स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे.
शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळांमधून स्वच्छता ज्ञानयात्रा व जनजागृती फेऱ्यांमध्ये पुढाकार घ्यावा.
सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट व युवक मंडळांनी श्रमदान व स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा.
धर्मगुरु व आध्यात्मिक नेत्यांनी आपल्या प्रवचनांतून, सत्संगांतून स्वच्छतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा.
"स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सेवा आहे. गावातील प्रत्येक हात या कार्यात जोडला गेला, तरच खऱ्या अर्थाने स्वच्छ व विकसित भारताचे स्वप्न साकार होईल," असे आवाहन करत मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना अभियानाचे दैनंदिन अहवाल व छायाचित्रे विहित पोर्टलवर नियमितपणे अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक श्री. गजानन खुळे यांनीही सर्व गटविकास अधिकारी व यंत्रणांना अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले असून, वाशिम जिल्हा या अभियानात अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
0 Response to "17 पासुन स्वच्छता ही सेवा अभियान: स्वच्छ व विकसित भारताच्या उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा: मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान"
Post a Comment