स्वच्छता उपक्रमातून ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’चा संदेश
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छता उपक्रमातून ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’चा संदेश
कामरगाव येथील पी.एम. श्री. जिल्हा परिषद विद्यालयात १० दिवसीय Social Media IEC Campaign ला उत्स्फूर्त प्रतिसाद*
वाशिम, : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद वाशिम यांच्या वतीने ‘स्वच्छ गाव – सुरक्षित पर्यावरण’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या १० दिवसीय Social Media IEC Campaign अंतर्गत कामरगाव येथील पी.एम. श्री. जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्वच्छता व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. या अभियानाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक गजानन खुळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आणि कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्रीकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ची प्रभावी अंमलबजावणी, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर कमी करणे, ओला व सुका कचरा स्वतंत्र करणे, जुन्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट आणि सुरक्षित पर्यावरणाबाबत जनजागृती हा अभियानाचा मुख्य उद्देश होता.
अभियानातील दररोजचा संदेश शाळेतील सर्व वर्गांच्या ग्रुपवर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित उपक्रम प्रत्यक्ष राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. ‘प्रत्येक घरातून कचऱ्याचे चार प्रकारात वर्गीकरण’, ‘उघड्यावर कचरा टाकू नका’, ‘झाकलेल्या घंटागाडीचा वापर करा’, ‘ओल्या कचऱ्यापासून खत तयार करा’, ‘प्लास्टिकमुक्त गावाची शपथ’, ‘मोठ्या प्रमाणातील कचऱ्याची जबाबदारी’, ‘शाळा व सार्वजनिक संस्थांची भूमिका’ तसेच ‘नियमांचे पालन’ या विषयांवर विविध उपक्रम घेण्यात आले.
अभियानाचा शाळेच्या परिसरावरही सकारात्मक परिणाम दिसून आला. परिसरातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले असून प्लास्टिकचा वापरही घटला. शालेय पोषण आहारातून निर्माण होणारा भाज्यांचा देठ, उर्वरित ओला कचरा तसेच झाडांची गळून पडलेली पाने एकत्रित करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्याचे प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमातून ‘कचरा ही समस्या नसून योग्य व्यवस्थापन केल्यास तो संसाधन ठरू शकतो’, याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘SWM वाशिम’ अशी मानवी साखळी तयार करून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. कचरा निर्मिती कमी करणे, कचऱ्याचे चार-प्रवाही वर्गीकरण करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारण्याची भावना अधिक दृढ झाली. ‘स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून दैनंदिन जीवनशैली आहे’, हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आला.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष काईट, इयत्ता ५ वी ते ८ वीचे पर्यवेक्षक गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नीता तोडकर, दिपाली खोडके, सतीश चव्हाण, चंद्रशेखर पिसे, पुष्पा व्यवहारे, भूमिका भाकरे, शितल देशमुख, कैलास वानखडे, धन्नू गारवे आणि चेतन करडे या शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अभियान यशस्वी केले.
0 Response to "स्वच्छता उपक्रमातून ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’चा संदेश"
Post a Comment