रोजगार व असंघटित उद्योग क्षेत्राची अचूक माहिती मिळविण्यासाठी वाशिममध्ये दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांना प्रारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
रोजगार व असंघटित उद्योग क्षेत्राची अचूक माहिती मिळविण्यासाठी वाशिममध्ये दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांना प्रारंभ
वाशिम, : सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने राबविण्यात येणारे नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग-आस्थापनांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांचा शुभारंभ वाशिम जिल्ह्यात करण्यात आला. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) यांच्या सहकार्याने अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत राज्यभर ही सर्वेक्षणे राबविण्यात येणार आहेत.
जिल्हानिहाय अद्ययावत व विश्वासार्ह सांख्यिकी माहिती उपलब्ध करून शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेला बळकटी देणे हा या सर्वेक्षणांचा प्रमुख उद्देश आहे. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षणाद्वारे रोजगार, बेरोजगारी, महिला कामगारांचा सहभाग, स्वयंरोजगार तसेच असंघटित रोजगार क्षेत्रासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती संकलित केली जाणार आहे.
तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-आस्थापनांच्या वार्षिक सर्वेक्षणाद्वारे उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील उद्योग-आस्थापनांची संख्या, रोजगाराच्या संधी, कार्यरत कामगारांची संख्या, प्रति कामगार व प्रति आस्थापना स्थूल मूल्यवर्धन, उत्पादकता आणि वेतन यांसारख्या विविध आर्थिक निर्देशांकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्राचा या सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
या सर्वेक्षणांच्या कार्यारंभाचा शुभारंभ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपायुक्त अनिल बी. रेठे, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, वाशिम, कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच इप्सॉस रिसर्च प्रा. लि.चे प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी भेट देणाऱ्या अधिकृत कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. या सर्वेक्षणातून मिळणारी माहिती शासनाच्या विकासात्मक योजना आणि लोककल्याणकारी धोरणांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Response to "रोजगार व असंघटित उद्योग क्षेत्राची अचूक माहिती मिळविण्यासाठी वाशिममध्ये दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांना प्रारंभ"
Post a Comment