-->

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय तपासणी पथक दाखल.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय तपासणी पथक दाखल.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय तपासणी पथक दाखल. 

 

सीईओ प्रमिला जाखलेकर यांच्या नेतृत्वात तपासणी सुरू.


मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींच्या मूल्यमापन प्रक्रियेचा भाग म्हणून जिल्हा परिषद गोंदिया येथील तपासणी समितीने वाशिम  तालुक्यातील शेलू बुद्रुक व  जांभरून परांडे या गावांची सविस्तर पाहणी केली.

या तपासणी समितीमध्ये पथक प्रमुख तथा जिल्हा परिषद गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मधुकर वासनिक, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मनरेगा) विजय लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पवन खंदारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी निरंजन अग्रवाल, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) वैशाली खोब्रागडे, तसेच सुरेंद्र टेंबरे व धर्मराज लंजे यांचा समावेश आहे.

समितीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निकषांनुसार गावातील विविध विकासकामे, स्वच्छता व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, ग्रामविकास उपक्रम तसेच ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय व आर्थिक दस्तऐवजांची बारकाईने तपासणी केली. यावेळी ग्रामपंचायतींनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती समिती सदस्यांना देण्यात आली.

ग्रामपंचायत शेलू बुद्रुक येथे ग्रामविकास, स्वच्छता, स्मशानभूमीचे सौंदरीकरण, जलव्यवस्थापन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत जांभरून परांडे येथे विविध विकासकामे, सार्वजनिक सुविधा व ग्रामस्थांच्या सहभागातून साकारलेले उपक्रम समितीसमोर सादर करण्यात आले.

दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये अभियानाच्या उद्दिष्टांनुसार करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामकाजाबाबत समितीने समाधान व्यक्त केले. गावातील विकासकामांची गुणवत्ता, ग्रामस्थांचा सहभाग, स्वच्छता व शाश्वत विकासाच्या दिशेने करण्यात आलेल्या प्रयत्नांचे समिती सदस्यांनी कौतुक केले.

या पाहणीदरम्यान वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने, विस्तार अधिकारी दीपकसिंग सोळंके, विनय बोरचाटे, उपअभियंता (बांधकाम)  खोडवे, उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा)  मार्गे तसेच पंचायत समिती व तालुकास्तरावरील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-------

यावेळी सेलू बुद्रुक येथे लोकशाहीर उत्तम उर्फ धम्मानंद इंगोले यांनी समितीसमोर गावातील विकास कामाचे लोककलेच्या माध्यमातून सादरीकरण केले. पथक प्रमुख तथा सीईओ प्रमिला दाखलेकर यांनी इंगोले यांच्या कलेचे कौतुक केले.

-----------

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण विकास, पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि शाश्वत ग्रामव्यवस्थापन यांना चालना मिळत असून वाशिम तालुक्यातील ग्रामपंचायतींनी या अभियानात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे जिल्ह्याची प्रतिष्ठा उंचावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


0 Response to "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय तपासणी पथक दाखल. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article