सणोत्सव व पोटनिवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
साप्ताहिक सागर आदित्य
सणोत्सव व पोटनिवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम, जिल्ह्यात दिनांक २७ मे २०२६ रोजी मुस्लिम धर्मीयांचा ‘बकरी ईद’ सण (चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे पुढे), दिनांक २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती तसेच दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी होणार असून त्यानिमित्त मिरवणुका, सामूहिक पूजा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच मानोरा नगर पंचायत पोटनिवडणुकीमुळे संबंधित परिसरात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे आवश्यक असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी नमूद केले होते. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात दि. २७ मे २०२६ पासून ते दि. ८ जून २०२६ रोजी रात्री २४ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या आदेशान्वये शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, लाठ्या, सुरे किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तूजवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे फेकण्यासाठीची साधने जमा करणे किंवा तयार करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक घोषणा देणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, अशांतता निर्माण करणारे फलक, चिन्हे किंवा साहित्य प्रसारित करणे, तसेच नागरी सभ्यता व सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचेल अशा कृतींनाही मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे किंवा मिरवणुका काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
मात्र, कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकाऱ्यांची विशेष परवानगी घेतलेल्या मिरवणुका व कार्यक्रमांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
0 Response to "सणोत्सव व पोटनिवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू"
Post a Comment