जिल्हयाला पोहचला ५ लाख ९५ हजार लिटर इंधन साठा
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हयाला पोहचला ५ लाख ९५ हजार लिटर इंधन साठा
वाशिम, दि. २७ जिल्हयाला विविध ऑईल कंपन्यांकडून दि.२६ मे रोजी एकूण ५ लाख ९५ हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाला आहे. यामध्ये १ लाख ७९ हजार ५०० लिटर पेट्रोल तर ४ लाख १५ हजार ५०० लिटर डिझेलचा समावेश आहे. पुढील काळातही दररोज नियमितपणे इंधन साठा जिल्हयाला प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
प्राप्त इंधन साठ्यामध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) कंपनीकडून ४७ हजार ५०० लिटर पेट्रोल व १ लाख ५१ हजार ५०० लिटर डिझेल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीकडून ५१ हजार लिटर पेट्रोल व १ लाख ५० हजार लिटर डिझेल, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) कंपनीकडून २९ हजार लिटर पेट्रोल व ५० हजार लिटर डिझेल, तसेच नायरा कंपनीकडून ४८ हजार लिटर पेट्रोल व ६४ हजार लिटर डिझेल प्राप्त झाले आहे. जिओ बीपी कंपनीकडून ४ हजार लिटर पेट्रोलचा साठा प्राप्त झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अतिरिक्त स्वरुपात पेट्रोल किंवा डिझेलची खरेदी न करता आवश्यक तेवढाच साठा खरेदी करावा. तसेच पेट्रोल पंपांवर होणारी अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्यांच्या सतत संपर्कात असून जिल्हयातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. सर्व पेट्रोल पंप चालक व मालकांशी प्रशासन संपर्कात असून पेट्रोल पंपांवर सुरळीत इंधन वितरण व्हावे यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत कलम ३ व ७ नुसार विहित मर्यादेपेक्षा जास्त इंधन साठा करणे, साठेबाजी करणे अथवा नफेखोरी करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. इंधनाचा अतिरिक्त अथवा अनधिकृत साठा करणारे नागरिक, व्यापारी तसेच पेट्रोल पंप चालक किंवा मालक यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
0 Response to "जिल्हयाला पोहचला ५ लाख ९५ हजार लिटर इंधन साठा"
Post a Comment