मान्सूनपूर्व सज्जतेसाठी यंत्रणांनी अॅक्शन मोडवर यावे; आपत्ती व्यवस्थापनात समन्वय महत्त्वाचा
साप्ताहिक सागर आदित्य
मान्सूनपूर्व सज्जतेसाठी यंत्रणांनी अॅक्शन मोडवर यावे; आपत्ती व्यवस्थापनात समन्वय महत्त्वाचा
– जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
एकबुर्जी प्रकल्पावर 'मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन' प्रशिक्षण संपन्न
वाशिम,
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी आपापसात चोख समन्वय आणि संपर्क ठेवणे अनिवार्य आहे. आपत्तीच्या काळात एकही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी यंत्रणेने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने वाशीम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर २६ मे रोजी एक दिवसीय 'मान्सूनपूर्व प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल, तहसीलदार निलेश पळसकर, ग्रामीण ठाणेदार श्रीदेवी पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आणि नागपूर SDRF चे पोलीस उपनिरीक्षक बोंदर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गाव पातळीवर आपत्ती निवारण संस्कृती रुजवा
तहसीलदार पळसकर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तहसीलदार निलेश पळसकर यांनी प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. स्थानिक लोकांमध्ये आपत्तीशी सुनियोजित लढा देण्याची संस्कृती निर्माण करणे हा या प्रशिक्षणाचा हेतू आहे. धोका आणि वाईट परिस्थितीचे योग्य विश्लेषण करून गावांनी स्वतःचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, जेणेकरून आपत्तीच्या काळात गाव प्रशासनाला बळकटी मिळेल,असे त्यांनी सांगितले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सद्यस्थितीत हवामान बदलामुळे अतिवृष्टी, पूर आणि वीज पडणे अशा आपत्तींचा धोका वाढला आहे. यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन केले जात आहे. वाशीम जिल्ह्यात सध्या **१७३ पूर प्रवण गावे** असून त्यापैकी **६ गावे अतिसंवेदनशील** म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील **१४८ ग्रामपंचायतींना ५० प्रकारच्या अद्ययावत साहित्यांचे 'आपत्ती प्रतिसाद किट'** वितरित करण्यात आले आहे.
**SDRF कडून 'प्रशिक्षणाचे धडे**
नागपूर SDRF चे प्रशिक्षक व पोलीस उपनिरीक्षक बोंदर यांनी उपस्थितांना आपत्ती निवारण, प्रथमोपचार (First Aid), पूर्वतयारी आणि सीपीआर (CPR) देण्याबाबतचे महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले.
बोटींगचे थरारक प्रात्यक्षिक
पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढणे, पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव कसा वाचवावा, आणि लाईफ जॅकेट व इतर बचावात्मक साहित्याचा अचूक वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. आपत्कालीन परिस्थितीत बोटीचा वापर करून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत कशी पोहोचवता येते, याचे धडे यावेळी उपस्थित आपदा मित्र आणि बचाव पथकाला देण्यात आले.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपत्तीच्या काळात पोलीस दल आणि महसूल विभाग हे आघाडीवर राहून काम करतात. पावसाळ्यात पूर परिस्थिती किंवा इतर आपत्कालीन प्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच तातडीने मदतकार्य पोहोचवण्यासाठी पोलीस यंत्रणा चोवीस तास सतर्क राहील.
या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस कर्मचारी, कोतवाल, आपदा मित्र, शोध व बचाव पथक तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद मारवाडी व तौफिक बेनीवाले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मानले.
0 Response to "मान्सूनपूर्व सज्जतेसाठी यंत्रणांनी अॅक्शन मोडवर यावे; आपत्ती व्यवस्थापनात समन्वय महत्त्वाचा"
Post a Comment