मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीमेत 'बीएलए'चा रोल अत्यंत महत्त्वाचा
साप्ताहिक सागर आदित्य
मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीमेत 'बीएलए'चा रोल अत्यंत महत्त्वाचा
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक
वाशिममधील १० लाख मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी
वाशिम, दि. २७ मे (जिमाका )भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-एसआयआर) राबविण्याचे आदेश दिले असून महाराष्ट्राचा या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यातील सुमारे १० लाख २२ हजार ८२१ मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी या मोहिमेद्वारे करण्यात येणार असून सर्व पात्र मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच या प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने ज्या राजकीय पक्षांनी बीएलएची नेमणूक अद्याप केलेली नाही त्यांनी तात्काळ बीएलए नियुक्त करावेत, जेणेकरून पुढील प्रक्रिया राबविण्यास सोईचे होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली देवकर यांच्यासह मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाकडून यापूर्वी २००२-०४ या कालावधीत विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आले होते. मात्र मागील २० वर्षांमध्ये केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण करण्यात आल्यामुळे आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणावर शहरीकरण, स्थलांतर व मतदारांच्या नोंदींमध्ये बदल झाल्यामुळे काही ठिकाणी दुबार नावे राहिल्याची शक्यता आहे. अनेक मतदारांनी नवीन ठिकाणी नावनोंदणी केली असली तरी जुन्या ठिकाणचे नाव वगळले नसल्याने मतदार याद्यांची अचूकता राखण्यासाठी हे विशेष सखोल पुनरिक्षण आवश्यक ठरत आहे.
या मोहिमेची प्रक्रिया जून ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्रासाठी विशेष वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मोहिमेअंतर्गत २० ते २९ जून २०२६ या कालावधीत गणना अर्ज छपाई व बीएलओ प्रशिक्षण होईल. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन 'पूर्वमाहिती भरलेले गणना प्रपत्र' (Pre Filled Enumeration Form) मतदारांना वितरित करतील आणि त्यांचे संकलन करतील.
गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास अधिकारी संबंधित घराला किमान तीन वेळा भेट देणार असून त्याची योग्य नोंद ठेवली जाईल. या प्रपत्रामध्ये मतदाराची सध्याची माहिती तसेच २००२-०४ मधील जुन्या नोंदींचा संदर्भ समाविष्ट असेल. मतदारांना स्वतःची किंवा आपल्या आई-वडील अथवा आजी-आजोबा यांच्या २००२-०४ मधील मतदार यादीतील माहिती voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून सहज उपलब्ध होणार असून, ही माहिती जतन करून गृहभेटीदरम्यान बीएलओ यांना उपलब्ध करून देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मतदारांना हे गणना प्रपत्र ऑनलाईन पद्धतीनेही भरता येणार आहे.
यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील आणि ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येतील. ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्यांची अधिकृत प्रसिद्धी करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या मतदारांच्या नोंदींची जुळवणी होणार नाही किंवा त्रुटी आढळतील अशा मतदारांना नोटिसा पाठविल्या जातील आणि अशा व्यक्तींची यादी स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालय तसेच जिल्हा व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेत आधार कार्ड हे ओळख पुरावा म्हणून ग्राह्य असले तरी आधार अधिनियमाच्या कलम ९ नुसार ते नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
वाशिम जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या तपशीलांची खातरजमा १,१०० मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून, या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात येणारे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) सहकार्य करणार आहेत. सध्या जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांनी २,३३२ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.
दरम्यान, प्रशासनाकडून विद्यमान मतदारांची माहिती २००२-०४ मधील जुन्या मतदार याद्यांशी जुळविण्याचे काम सुरू असून आजमितीस वाशिम जिल्ह्यात ८३.९१ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये ३३-रिसोड मतदारसंघात ९१.६४ टक्के, ३४-वाशिम मतदारसंघात ७८.२२ टक्के आणि ३५-कारंजा मतदारसंघात ८२.७९ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. संविधानाच्या कलम ३२६ नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आणि वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून, या राष्ट्रीय मोहिमेत जिल्ह्यातील सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या बैठकीस भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बहुजन समाज पार्टी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0 Response to "मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीमेत 'बीएलए'चा रोल अत्यंत महत्त्वाचा"
Post a Comment