-->

आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करावे,

आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करावे,

 


साप्ताहिक सागर आदित्य 

🏥 आरोग्य सेवांच्या गुणवत्तेसाठी यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे

— जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध आरोग्य योजना व कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.


बैठकीत चालू वर्षाअखेर जिल्ह्यातील किमान ५० टक्के आरोग्य संस्था राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) अंतर्गत प्रमाणित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. जिल्हा रुग्णालय वाशिमच्या NQAS प्रमाणीकरणाला प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.


आगामी २८ जून रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर लसींचा साठा सुरक्षित राहण्यासाठी वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच पल्स पोलिओ आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबत प्रभावी जनजागृती करण्यासाठी शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि गर्दीच्या भागात माहितीपर बॅनर्स व पोस्टर्स लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.


या मोहिमेत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले. नियमित लसीकरणाची डेटा एन्ट्री वेळेत पूर्ण करण्यासह गोवर साथीचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी ठेवण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.


गरजू मातांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ वेळेत मिळावा यासाठी गरोदर मातांच्या नोंदणीवेळीच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अपुरी कागदपत्रे गरोदरपणाच्या कालावधीतच पूर्ण करून घेण्यावर भर देण्यात आला.


जिल्ह्यातील स्त्री-पुरुष जन्मदर संतुलित राखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत तपासण्या आणि डिकॉय कारवायांमध्ये सातत्य ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.


‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत सर्व शासकीय विभागांच्या समन्वयातून गावोगावी आरोग्य मेळावे आयोजित करून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी व उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.


याशिवाय टेलिमेडिसिन सेवा, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम तसेच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात आला.


बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


#Washim #HealthDepartment #NQAS #PulsePolio #HPV #PublicHealth #Maharashtra

0 Response to "आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करावे, "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article