घनकचरा व्यवस्थापन नियमाचे पालन करा! सीईओ अर्पित चौहान: जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन:
साप्ताहिक सागर आदित्य
घनकचरा व्यवस्थापन नियमाचे पालन करा!
सीईओ अर्पित चौहान:
जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन:
सर्वोच्च न्यायालच्या निकालानंतर केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयांतर्गत पेयजल व स्वच्छता विभागाने ग्रामीण भागासाठी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम-२०२६ लागू केला असून, याबात जिल्हा परिषदेच्या वतीने जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 5000 च्या वर लोकसंख्या असलेल्या बाजारपेठा असलेल्या 21ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 22) मालेगाव तालुक्यातील मुंगळा, मेडशी आणि राजाकिन्ही या ग्रामपंचायतीना भेटी देऊन गावाची तपासणी करण्यात आली. गावात अस्तित्वात असलेल्या स्वच्छता सुविधांची देखभाल करण्याचे व त्याचा नियमित वापर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मालेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश कंकाळ, जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे राम श्रृंगारे, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर महाले यांची स्वच्छता विषयक आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास अधिकारी सांगळे, घुगे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------
*...तर वीज आणि पाणी बंद करण्याचे निर्देश:*
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था व संबंधितांवर वीज आणि पाणी बंद करण्याची कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.
मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांची माहिती संकलित करून त्यांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
------------------
सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य शासन, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाबाबत विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांची माहिती संकलित करून त्यांची नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच पर्यटन स्थळे, यात्रा स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत..
-----------------------
विशेष कक्षाची स्थापना:
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन अधिनियम-२०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात सहआयुक्त नगर विकास, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) तसेच सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा विशेष कक्ष ग्रामीण व शहरी भागातील घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध घटकांवर लक्ष केंद्रित करून नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार आहे.
-------------
नियमांचे पालन करा:
नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी देखरेख आणि आवश्यक ती कारवाईही करण्यात येणारं आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या नियमांचे पालन करून स्वच्छ व आरोग्यदायी ग्रामीण वातावरण निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील यांनी केले आहे.
0 Response to "घनकचरा व्यवस्थापन नियमाचे पालन करा! सीईओ अर्पित चौहान: जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन:"
Post a Comment