-->

जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; ८ लाख ४२ हजार लिटर इंधन दाखल

जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; ८ लाख ४२ हजार लिटर इंधन दाखल



 साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; ८ लाख ४२ हजार लिटर इंधन दाखल

अफवांवर विश्वास ठेवू नका, अतिरिक्त खरेदी टाळा : जिल्हा प्रशासनाचे आवाहन


वाशिम, दि. २४  जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यकतेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  विविध ऑईल कंपन्यांकडून जिल्ह्याला एकूण ८ लाख ४२ हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) कडून ६५ हजार लिटर पेट्रोल व २ लाख ९३ हजार लिटर डिझेल, भारत पेट्रोलियम (BPCL) कडून ६३ हजार लिटर पेट्रोल व १ लाख ८३ हजार लिटर डिझेल, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) कडून ४३ हजार ५०० लिटर पेट्रोल व १ लाख ३५ हजार ५०० लिटर डिझेल प्राप्त झाले आहे. तसेच जिओ कंपनीकडून ३९ हजार लिटर डिझेल आणि नायरा कंपनीकडून १० हजार लिटर पेट्रोल व १० हजार लिटर डिझेल प्राप्त झाले आहे.

यामध्ये एकूण १ लाख ८१ हजार ५०० लिटर पेट्रोल आणि ६ लाख ६० हजार ५०० लिटर डिझेलचा समावेश असून एकत्रित साठा ८ लाख ४२ हजार लिटर इतका आहे. पुढील काळातही दररोज इंधन साठा जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्या तसेच पेट्रोल पंप चालकांच्या सतत संपर्कात असून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल सुरळीतपणे उपलब्ध होत आहे. इंधन वितरण सुरळीत राहावे यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, अतिरिक्त स्वरूपात इंधन साठवू नये आणि गरजेपुरतेच पेट्रोल-डिझेल खरेदी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील कलम ३ व ७ अन्वये विहित मर्यादेपेक्षा जास्त इंधन साठा करणे, साठेबाजी करणे अथवा नफेखोरी करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अतिरिक्त किंवा अनधिकृत इंधन साठा करणारे नागरिक, व्यापारी तसेच पेट्रोल पंप चालक अथवा मालक यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

0 Response to "जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; ८ लाख ४२ हजार लिटर इंधन दाखल"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article