महाराष्ट्रात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम
साप्ताहिक सागर आदित्य
महाराष्ट्रात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम
वाशिम दि. २५ मे भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अन्वये प्राप्त अधिकारात भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण घेण्याबाबत २४ जून २०२५ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशात नमूद केल्याप्रमाणे यापूर्वी देशामध्ये १९५२-५६, १९५७, १९६१, १९६५-१९६६, १९८३-८४, १९८७-८९, १९९२-१९९५, २००२-२००४ यावर्षी विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आलेले आहे. भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. संविधानाच्या कलम ३२६ प्रमाणे मतदार यादीमध्ये मतदारांचे नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असणे तसेच वयाची १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
मागील २० वर्षामध्ये विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आलेले नाही. दरवर्षी केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण घेण्यात आलेले आहे. मागील २० वर्षात मतदार याद्यांमध्ये मोठया प्रमाणात समावेशन आणि वगळण्या झालेल्या आहेत. झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे मोठया प्रमाणात एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणाकडे स्थलांतर झालेले आहे. असे करताना अनेक वेळा काही मतदारांनी आपल्या वास्तव्याच्या नवीन जागी मतदार यादीमध्ये नव्याने नाव नोंदविले मात्र, जुन्या ठिकाणचे नाव वगळले नाही. यामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार नावे वाढली असल्याची शक्यता आहे.
भारतीय संविधानाच्या कलम ३२६ मधील मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने असलेल्या मुलभुत पूर्व अटी विचारात घेता मतदार यादीतील व्यक्ती भारतीय नागरिक आहे याची खातरजमा करण्याची जबाबदारी आयोगावर येते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम २१ नुसार भारत निवडणूक आयोगाला मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण करण्याचे अधिकार आहेत. देशामध्ये पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये व दुसऱ्या टप्प्यात ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांत विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२५-२६ मध्ये राबविण्यात आलेला आहे.
आता महाराष्ट्र राज्यासह एकुण १६ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा १,००,२५३ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात येणारे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी' (BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत.
राज्यात सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल.
टप्पा व कालावधी
* गणना अर्जांची छपाई तसेच बीएलओ यांना प्रशिक्षण कालावधी : २० ते २९ जून २०२६.
* मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील : ३० जून ते २९ जुलै २०२६.
* प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी : ५ ऑगस्ट २०२६
* प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदवणे : ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६
* दावे व हरकती निकालात काढणे : ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत
* अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी : ७ ऑक्टोबर २०२६.
या वेळापत्रकाप्रमाणे ३० जून, २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन काही माहिती आधीच भरलेल्या गणना प्रपत्राचे मतदारांना वाटप करणार आहेत. या गणना प्रपत्रामध्ये मतदाराची मतदार यादीतील सध्याची माहिती भरलेली असणार आहे. संबंधित मतदाराची किंवा त्याच्या आई-वडील/ आजी-आजोबा यांची मागील विशेष सखोल पुनरिक्षणामधील (देशात २००२ - २००४ मध्ये घेतलेल्या) माहिती आधीच भरलेली असेल किंवा मतदाराला स्वत: भरता येईल. तसेच आपले नविन छायाचित्र सुद्धा उपलब्ध करुन देता येईल.
सद्यस्थितीत सध्याच्या मतदारांची जुळवणी मागील विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतील संबंधित मतदाराच्या किंवा त्याच्या आई-वडील/ आजी-आजोबा यांच्या नोंदीशी करण्याची कार्यवाही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडुन करण्यात येत आहे. प्रत्यक्ष H2H कालावधीत गणना प्रपत्रामध्ये जुनी माहिती भरणे सहज शक्य व्हावे, याकरिता ही पूर्वतयारी करण्यात येत आहे. आजमितीस राज्यात ७२.०४ % इतके मॅपिंग झाले आहे.
मतदारांना सुद्धा आपली किंवा आपल्या आई-वडील/ आजी-आजोबा यांची २००२-२००४ च्या कालावधीतील ( मागील विशेष सखोल पुनरिक्षण) मतदार यादीतील माहिती भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरून सहज उपलब्ध करुन घेता येईल. त्या साठी केवळ त्यावेळचे आपले राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ व संपुर्ण नाव एवढी प्राथमिक माहिती भरल्यास आपल्या जुन्या नोंदी सहज उपलब्ध होतील. ही माहिती मतदाराने आपल्याकडे जतन करुन ठेवावी व गृहभेटासाठी आलेल्या ओळखपत्रधारक मतदार नोंदणी अधिकाऱ्याला उपलब्ध करुन द्यावी. मतदार याद्या दोषविरहीत व अचूक असण्याच्या दृष्टीने व सर्व पात्र मतदारांचे मतदार यादीत नाव समाविष्ट असण्यासाठी या कार्यक्रमात सर्व मतदारानी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आपल्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.
गृह भेटीदरम्यान घर बंद आढळल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किमान ३ वेळापर्यंत संबंधित घरांना भेट देईल व भेट दिल्याची योग्य नोंद ठेवण्यात येईल. योग्यरितीने भरलेल्या व सही केलेले गणना प्रपत्र गोळा करण्यासाठी बीएलओ पुन्हा संबंधित मतदाराच्या घरी भेट देतील. संबंधित मतदारास आपले गणना प्रपत्र ऑनलाईन पध्दतीनेही भरता येईल. मतदारांकडुन प्राप्त झालेले गणना प्रपत्र विचारात घेऊन प्रारुप मतदार याद्या ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात येतील. प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतर, ज्या मतदारांची नावे पूर्वीच्या मतदार यादीतील नोंदीशी जुळवणी झाली नसतील किंवा त्यांच्या जुळवणीमध्ये काही त्रुटी असतील अशा व्यक्तिना मतदान नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत नोटीसा पाठविण्यात येतील. तसेच अशा व्यक्तींच्या नावाची यादी त्यांचे नाव समाविष्ट न झाल्याच्या संभावित कारणासह संबंधित मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय तसेच तहसिलदार कार्यालय इत्यादी ठिकाणी प्रसिध्द करण्यात येतील. जिल्हा निवडणूक अधिकारी व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर सुध्दा अशा याद्या प्रसिध्द करण्यात येतील.
मतदार यादीमध्ये नोंदी जुळवणी न झाल्यामुळे किंवा जुळवणीमध्ये त्रुटी निदर्शनास आल्यामुळे नोटीसा दिलेल्या मतदारांना सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी गणना प्रपत्राच्या मागे दर्शविलेली आहे. आधार या कागदपत्रासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आधार हे ओळख पुरावा म्हणून वापरले जाते. तथापि आधार अॅक्ट २०२६ च्या कलम ९ प्रमाणे आधारकार्ड नागरिकत्वाचा पुरावा म्हणून मानले जाणार नाही.
या सर्व प्रक्रियेत निवडणूक अधिकाऱ्या समवेत राजकीय पक्षांची भूमिका व सहकार्य सुध्दा अत्यंत महत्वाचे रहाणार आहे. यास्तव राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले प्रतिनिधी (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आतापर्यत फक्त १,१३,५५८ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जिल्हयातील प्रत्येक मतदार केंद्रावर जास्तीत जास्त मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी लवकरच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
00000
0 Response to "महाराष्ट्रात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम"
Post a Comment