मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांची आढावा सभा प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश
साप्ताहिक सागर आदित्य
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांची आढावा सभा
प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी (दि. 13) कारंजा पंचायत समिती येथे आयोजित सभेत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील आणि गटविकास अधिकारी पुनम राणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित कामांची पूर्तता तसेच ग्रामपंचायत स्तरावरील कामांमध्ये गती आणण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
सभेमध्ये ग्रामीण विकास, स्वच्छ भारत मिशन, पंचायत विभाग, नरेगा, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग आदी विविध विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ODF Plus उपक्रम, घरकुल योजना, १५ वा वित्त आयोग निधी खर्च, पाणीकर व घरकर वसुली, नरेगा कामे, अंगणवाडी सुविधा, शाळा व आरोग्य केंद्र बांधकाम, पाणीटंचाई उपाययोजना आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
------
मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान यांनी संबंधित विभागांना शासनाच्या योजनांची अंमलबजावणी वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यावर भर दिला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांची आढावा सभा प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश"
Post a Comment