अतिरिक्त सीईओ किरण कोवे यांनी दिले… 30 दिवसात 100 गावे मॉडेल करण्याचे लक्ष्य
साप्ताहिक सागर आदित्य
अतिरिक्त सीईओ किरण कोवे यांनी दिले…
30 दिवसात 100 गावे मॉडेल करण्याचे लक्ष्य
वाशिम दि 26
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे ओडीएफ प्लस मॉडेल करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी दिले. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे यांनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला.
मागील सहा महिन्यापासून एकही गाव मॉडेल घोषित न झाल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ओडीएफ प्लस मॉडेल साठी आवश्यक असलेली प्रलंबित कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची सुनावनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीदरम्यान त्यांनी सहा तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क करून विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. पुढील 30 दिवसात शंभर गावे ओडीएफ प्लस मॉडेल घोषित करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले. रिसोड मधून 5 आणि मानोरा तालुक्यातील 15 गावे आणि उर्वरित सर्व तालुक्यांना प्रत्येकी 20 गावे मॉडेल करण्याचे टार्गेट देण्यात आले. पुढील 1 महिन्यात करावयाच्या कार्यवाहीचे सुक्ष्म नियोजन करुन दिले. बैठकीला विस्तार अधिकारी सचिन गटलेवार यांच्यासह जिल्हा कक्षातील सल्लागार आणि तालुकास्तरावरील गट समन्वयक यांची उपस्थिती होती.
----------------------------
यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची काटेकोर अंमलबजावनी गावस्तरावर करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. कोवे यांनी केले. तसेच शासनाच्या निर्देशानुसार “स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु” ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या.
----------------------------
कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणारे अधिकारी मोजकेच…
शासनाकडुन निधी न आल्यामुळे जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांची 6 महिन्यापासुन वेतन थकल्याची बाब कर्मचाऱ्यांनी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे यांच्या निदर्शनास आणुन दिली. तेव्हा त्यांनी तत्परतेने राज्यस्तरावरील वरीष्ठ अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवर संवाद साधुन निधी पाठविण्याची विनंती केली. पुढील आठ दिवसात निधी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वरीष्ठ स्तरावरुन देण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी काम सांगणारे अधिकारी अनेक असतात मात्र कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणुन घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे मोजकेच अधिकारी असतात अशी भावनिक प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधुन उमटली.
0 Response to "अतिरिक्त सीईओ किरण कोवे यांनी दिले… 30 दिवसात 100 गावे मॉडेल करण्याचे लक्ष्य"
Post a Comment