छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांना प्रतिसाद ; सहाही तालुक्यांमध्ये यशस्वी आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांना प्रतिसाद ; सहाही तालुक्यांमध्ये यशस्वी आयोजन
वाशिम, नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी व अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने दि.१० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांना' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका मंडळ स्तरावर ही शिबिरे प्रभावीपणे राबविण्यात आली.
या उपक्रमांतर्गत वाशिम तालुक्यातील वारला व केकतउमरा, कारंजा तालुक्यातील हिवरा लाहे, मंगरूळपीर तालुक्यातील शेलू, मानोरा तालुक्यातील कुपटा, मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे तसेच रिसोड तालुक्यातील बाळखेड मंडळ क्षेत्रात शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सर्व ठिकाणी शिबिरे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रामुख्याने ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, वारस नोंद, नामांतरण, उत्पन्न व रहिवासी दाखले, जात प्रमाणपत्र, तसेच इतर प्रलंबित प्रकरणांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले. अनेक नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
शिबिरांमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करत होते. काही प्रकरणांचे जागेवरच निराकरण करण्यात आले, तर उर्वरित प्रकरणे निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज कमी झाली असून सेवा अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध झाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा उपक्रम विशेषतः उपयुक्त ठरला.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने अशा प्रकारची शिबिरे भविष्यातही नियमितपणे आयोजित करून नागरिकांना अधिकाधिक सेवा घराजवळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्यातला सेवा वितरणाचा तपशील :
महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिरामध्ये विविध महसूल सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. अभियानांतर्गत निकाली काढण्यात आलेले एकूण फेरफार २०६, ७/१२ मधील दुरुस्तीसंदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्ज ९७, ८१४ डिजिटल ७/१२, ८अ उतारे ५८६, यासोबतच १ हजार ४६ विविध प्रकारची प्रमाणपत्रे नागरिकांना वितरीत करण्यात आली. एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी १४७ अर्ज निकाली काढण्यात आले. १३३ जीवंत सातबारे, काही प्रकरणांचे जागेवरच निराकरण करण्यात आले असून उर्वरित प्रकरणे संबंधित कार्यालयांकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्तावित करण्यात आली.
कार्यक्रमाला महसूलसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Response to "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांना प्रतिसाद ; सहाही तालुक्यांमध्ये यशस्वी आयोजन"
Post a Comment