वाशिम तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन; नागरिकांनी लाभ घ्यावा – उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’
मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन;
नागरिकांनी लाभ घ्यावा – उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर
वाशिम, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी वाशिम तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ टप्पा क्र. १ अंतर्गत मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर यांनी केले.
या अभियानाबाबत माहिती देण्यासाठी तहसील कार्यालय, वाशिम येथे पत्रकार बांधवांची बैठक श्रीमती देवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार निलेश पळसकर यांनी उपस्थित पत्रकारांना शिबिरांच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
या शिबिरांच्या माध्यमातून वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसुली कामकाजाशी संबंधित विविध प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींचा सत्वर निपटारा करून शासनाच्या सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा उद्देश या अभियानामागे आहे.
या शिबिरांमध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी १५ पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एनए) परवानगी, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन, ‘सनद’ प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचे वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज स्वीकारणे, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांतील ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कामे करण्यात येणार आहेत.
दरम्यान, वाशिम तालुक्यातील विविध मंडळ स्तरावर मार्च ते मे २०२६ या कालावधीत समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महसुली सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर व तहसीलदार निलेश पळसकर यांनी केले.
मंडळ स्तरावरील समाधान शिबिरांचे नियोजन (टप्पा क्र. १)
०७ मार्च २०२६ – अनसिंग, जिल्हा परिषद उर्दू शाळा
१४ मार्च २०२६ – आसरा माता मंदिर, पारडी आसरा
१० एप्रिल २०२६ – केकत उमरा, ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सभा मंडप
१० एप्रिल २०२६ – शिंदे गुरुजी वारला हायस्कूल
१७ एप्रिल २०२६ – कोंडाळा झामरे, कोंडेश्वर संस्थान
१७ एप्रिल २०२६ – पार्डी टकमोर, ग्रामपंचायत कार्यालयासमोरील खुल्या जागेत मंडप
०८ मे २०२६ – मंडळ कार्यालय, वाशिम
१५ मे २०२६ – नागठाना, जिल्हा परिषद शाळेसमोरील खुल्या जागेत मंडप
१५ मे २०२६ – जि. प. वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा, राजगाव
0 Response to " वाशिम तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन; नागरिकांनी लाभ घ्यावा – उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर"
Post a Comment