-->

जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना राष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून द्यावे.

जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना राष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून द्यावे.



साप्ताहिक सागर आदित्य 

 मूल्यवर्धनातून राष्ट्रीय बाजारपेठ काबीज करा 

 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 


प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत खरेदीदार–विक्रेता संमेलन उत्साहात 


वाशिम,  जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना राष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून द्यावे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेत ग्रामीण उद्योजकांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.


 कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अंतर्गत आयोजित खरेदीदार–विक्रेता संमेलन दि. ४ मार्च २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. हा कार्यक्रम स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता.


यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर बोलत होते. 


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाबीज अकोलाचे महाव्यवस्थापक (विपणन) विजय देशमुख, महाव्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण) डॉ. प्रफुल्ल लहाने तसेच महाव्यवस्थापक (उत्पादन) विवेक ठाकरे उपस्थित होते.


प्रकल्प संचालक, आत्मा वाशिम अनिसा महाबळे यांनी प्रास्ताविक करताना जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती, उपलब्ध सुविधा आणि संमेलनामागील उद्देश सांगितला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरिफ शाह यांनी शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना या संमेलनातून मिळणाऱ्या व्यावसायिक संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


तालुकानिहाय सादरीकरणातून क्षमता अधोरेखित


जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या तालुक्यातील प्रमुख पिके, प्रक्रिया उद्योगाच्या संधी व मूल्यवर्धन उपक्रमांचे सादरीकरण केले. यामुळे जिल्ह्याच्या कृषी उत्पादन क्षमतेचे सर्वांगीण चित्र उपस्थितांसमोर आले.


खरेदीदार–उत्पादक थेट संवाद


संमेलनात राष्ट्रीय मसाले मंडळ कडून डॉ. ममता धनकुटे, नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक लिमिटेड कडून योगेश खुडेकर, ए. आर. ग्लोबल एक्झिम ट्रेडर्स कडून शमशुद्दीन शेख तसेच टील अँड स्पोर्ट लिमिटेड कडून चिराग जैन यांनी सादरीकरण केले. उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंग, ब्रँडिंग, दरनिर्धारण व बाजारपेठेतील संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. खरेदीदार व उत्पादक यांच्यात प्रत्यक्ष संवाद घडवून आणत व्यावसायिक संधींचे दालन खुले करण्यात आले.


कार्यक्रमस्थळी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते झाले. सहभागी खरेदीदार व विक्रेत्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


या खरेदीदार–विक्रेता संमेलनामुळे जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट बाजारपेठेची संधी उपलब्ध झाली असून शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी या संकल्पनेला अधिक बळ मिळाले आहे.


कार्यक्रमाचे संचालन कृषी उपसंचालक हिना शेख यांनी केले, तर तंत्र अधिकारी संतोष थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभाग व आत्मा यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

0 Response to "जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना राष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून द्यावे. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article