जिल्हास्तरीय “विकसित भारत युवा संसद” कार्यक्रमास युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हास्तरीय “विकसित भारत युवा संसद” कार्यक्रमास युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
युवा संसद लोकशाही मजबूत करणारा स्तुत्य उपक्रम – डॉ. नारायणराव गोटे
वाशिम, दि. मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जिल्हास्तरीय “विकसित भारत युवा संसद” कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 18 ते 25 वयोगटातील जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील नोंदणीकृत युवक-युवतींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा विषय “आणीबाणीचे 50 वर्षे : भारतीय लोकशाहीसाठीचे धडे” असा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभू श्रीरामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना (NSS) वाशिम जिल्हा समन्वयक डॉ. अशोक वाघ, मेरा युवा भारत केंद्र प्रतिनिधी नेहरू युवा मंडळकेकतउमरा अध्यक्ष युथ आयकॉन प्रदीप पट्टेबहादूर, प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे, डॉ. बी. आर. तनपुरे व प्रा. डॉ. केशव कोकाटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. लांजेवार यांनी केले. त्यांनी सहभागी स्पर्धकांनी इंग्रजी, हिंदी किंवा मराठी भाषेत आपले विचार मांडावेत, असे सांगून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
डॉ. अशोक वाघ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, युवा संसद ही संसदीय कार्य मंत्रालयामार्फत राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना असून, तरुणांना लोकशाही प्रक्रिया, संसदीय शिस्त व वादविवाद कौशल्याची जाणीव करून देणारे प्रभावी माध्यम आहे. 18 ते 25 वयोगटातील युवकांना नेतृत्वगुण विकसित करण्याची आणि राष्ट्रनिर्माणात योगदान देण्याची संधी या माध्यमातून मिळते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. नारायणराव गोटे यांनी विद्यार्थी दशेतच भारतीय संसदीय लोकशाहीची ओळख होणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. युवा संसद हा लोकशाही अधिक सक्षम व मजबूत करणारा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे यांनी नेतृत्वगुणांचा विकास घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या युवा संवाद कार्यक्रमासाठी 118 स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी 82 स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच स्पर्धकांमध्ये शामल देवळे, श्रुती देशमुख, मुस्कान भवानीवाले, नेहा इंगळे व हरिओम चौधरी यांची निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
निवड झालेले स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुंबई येथे विधानसभेत आयोजित युवा संसदेत सहभागी होणार असून, राज्यस्तरावरील विजेते राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथे आयोजित स्पर्धेत सहभागी होतील.
या कार्यक्रमात श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, पुष्पादेवी पाटील महाविद्यालय रिसोड, आर. ए. महाविद्यालय वाशिम, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मंगरूळपीर आदी महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेचे परीक्षण समाजसेवक सुशील भीमजीयानी, डॉ. डी. एम. ढवारे, डॉ. आर. व्ही. रुके, डॉ. विलास गायकवाड व डॉ. विकास चांदजकर यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. एस. पाथरकर यांनी “विकसित भारत युवा संसद” या विषयावर पीपीटी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. दीपक दामोदर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ या गीताने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संजय गोटे, डॉ. पी. जे. गोटे, डॉ. व्ही. एन. लांडे, डॉ. एस. व्ही. रुके, प्रा. बी. डी. पट्टेबहादूर, डॉ. फिरोज खान, डॉ. आर. जी. बोंडे, प्रा. कु. नयना मोतोळे, वीरेंद्र भोसले, लक्ष्मण गायकवाड व दिनकर दमगीर यांनी परिश्रम घेतले. विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "जिल्हास्तरीय “विकसित भारत युवा संसद” कार्यक्रमास युवकांचा उत्स्फूर्त सहभाग "
Post a Comment