वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे ‘खेलो होली – इको फ्रेंडली’ नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न.
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे ‘खेलो होली – इको फ्रेंडली’ नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न.
वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे राष्ट्रीय हरित सेना, वनराई इको क्लब व सामाजिक वनीकरण विभाग मानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलो होली, इको फ्रेंडली’ या उपक्रमांतर्गत नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेची सुरुवात वृक्षपूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिक्षक सतीश भगत उपस्थित होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून वनरक्षक शिल्पा घुमणे यांनी हजेरी लावली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना नैसर्गिक सामग्रीपासून रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. बाजारातील रासायनिक रंगांऐवजी घरच्या घरी हिरव्या पालेभाज्या, फुले, फळे व इतर नैसर्गिक घटकांचा वापर करून पर्यावरणपूरक रंग तयार करावेत, असे आवाहन करण्यात आले. तसेच होळीसाठी वृक्षतोड टाळावी व धुळवडीसाठी रासायनिक रंगांचा वापर करू नये, असे मार्गदर्शन राष्ट्रीय हरित सेना शिक्षक विकलसिंग राठोड यांनी केले.
मुख्याध्यापक प्रसेन भगत सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे यंदाची होळी नैसर्गिक व सुरक्षित रंगांनी साजरी केली पाहिजे.”
यावेळी शाळेतील शिक्षक वानखडे सर, जयस्वाल सर, अक्षय सर, मोहसीन सर, मार्गे सर, तायडे सर तसेच शिक्षिका भालेराव मॅडम, चातुरकर मॅडम, इंगोले मॅडम, सरनाईक मॅडम, इंगळे मॅडम, पारधी भाऊ व वन कर्मचारी पांडे आदी उपस्थित होते.
🎨 नैसर्गिक रंग तयार करण्याच्या पद्धती
🔴 लाल रंग :
जास्वंदाच्या फुलांची बुकटी किंवा डाळिंबाच्या साली उकळून लाल रंग मिळविता येतो.
🟢 हिरवा रंग :
पालक, कोथिंबीर किंवा मेहंदीच्या पानांची भुकटी पिठात मिसळावी. तसेच तीन चमचे मेहंदीचा रस एक लिटर पाण्यात टाकावा.
🟡 पिवळा रंग :
दोन चमचे हळद बेसनात मिसळून एक लिटर पाण्यात टाकावी.
🟠 केसरी रंग :
पळस (केसुला) फुले खलबत्त्यात कांडून त्याचा सुमारे ५० मिली रस एक लिटर पाण्यात टाकावा.
🌸 गुलाबी / गडद रंग :
बीट उकळून किंवा त्याचा रस वापरून गुलाबी रंग तयार करता येतो.
पर्यावरण व आरोग्याचे रक्षण करण्यासाठी यंदाची होळी नैसर्गिक रंगांनी साजरी करण्याचे आवाहन राष्ट्रीय हरित सेना व इको क्लब तर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मार्गे सर यांनी केले.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे ‘खेलो होली – इको फ्रेंडली’ नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न."
Post a Comment