पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावार आंदोलन सुरु
साप्ताहिक सागर आदित्य
पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावार आंदोलन सुरु
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सेवा-सुरक्षा व सामाजिक संरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने राज्य सरकारकडे केली असून या मागण्यांसाठी राज्यातील सुमारे 200 कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत, उपाध्यक्ष बंडू हिरवे यांच्या नेतृत्वात आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विभागातील काही अधिकारी जाणीवपूर्वक वरिष्ठांची दिशाभूल करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची जाहिरात देऊन विहित प्रक्रिया करून भरती केली असली तरी सदर कर्मचाऱ्यांची बॅक डोअर एन्ट्री झाली अशी खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली जात आहे. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील काही अधिकारी आऊटसोर्सिंग करण्याचा छुपा अजेंडा राबवित आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास या विभागाच्या "जनता द्रोही" छुपा अजेंडा प्रसिद्धी माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, पाणीपुरवठा, जनजागृती, क्षमता बांधणी आणि घराघरात नळजोडणी (हर घर जल) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ऑक्टोबर २०२५ पासून पगार झाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यावेळी 28 जिल्ह्यातील प्रतिनिधींनी आंदोलनात भाग घेतला होता.
*****
0 Response to "पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावार आंदोलन सुरु"
Post a Comment