८ मार्चपूर्वी सर्व निर्देशांकांची शंभर टक्के परिपूर्णता साध्य करावी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
८ मार्चपूर्वी सर्व निर्देशांकांची शंभर टक्के परिपूर्णता साध्य करावी
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
आकांक्षीत जिल्हा व आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत ‘संपूर्णता अभियान २.०’चा प्रारंभ
वाशिम, ‘संपूर्णता अभियान २.० हे केवळ प्रशासकीय कार्यक्रम नसून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आकांक्षीत जिल्हा व आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत निश्चित करण्यात आलेले निर्देशांक पूर्णत्वास नेणे, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ८ मार्चपूर्वी सर्व निर्देशांकांची शंभर टक्के परिपूर्णता साध्य करणे हे आपले सामूहिक ध्येय आहे. त्यासाठी सर्व विभागांनी मिशन पद्धतीने परस्पर समन्वय राखून काम करावे. कोणताही लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, याची विशेष दक्षता घ्यावी,’ असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम व आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘संपूर्णता अभियान २.०’चा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी समाधान लोणसुणे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावणे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, सर्व यंत्रणांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन कामकाजाची पाहणी करावी. केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा. उद्दिष्टपूर्ती करताना वेळेचे काटेकोर पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
संपूर्णता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल. प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण काम केल्यास निश्चितच शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांनी केले. त्यांनी संपूर्णता अभियान २.० ची उद्दिष्टे, कार्यपद्धती तसेच नीती आयोगाने निश्चित केलेले निर्देशांक याबाबत सविस्तर माहिती दिली. या अभियानाच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्य, शिक्षण तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित बाबींमध्ये शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर विविध यंत्रणा प्रमुखांनी त्यांच्या-त्यांच्या विभागांचे कृती आराखडे सादर केले. जिल्ह्यातील सध्याची स्थिती, अपेक्षित परिपूर्णता तसेच त्यासाठी आवश्यक पुढील कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी सांगितले की, नीती आयोगाने निश्चित केलेल्या एकूण ११ निर्देशांकांवर जिल्हा परिषद यंत्रणेचा विशेष भर राहील. ८ मार्चपूर्वी शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिनानिहाय नियोजन करून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोवे म्हणाले, जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद यंत्रणा संपूर्ण क्षमतेने कार्यरत असून, ८ मार्चपूर्वी सर्व निर्देशांकांमध्ये शंभर टक्के परिपूर्णता साध्य करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून काम केल्यास हे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास विविध यंत्रणा प्रमुख, अंगणवाडी सेविका तसेच नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
फिरत्या वाहन विक्री केंद्र (मोबाईल व्हॅन) वाहनांचे औपचारिक वितरण :
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा अभियान कक्षामार्फत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद अंतर्गत सहा फिरती विक्री केंद्र वाहने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान व उपस्थितांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून वाहनांचा प्रारंभ केला.
0 Response to "८ मार्चपूर्वी सर्व निर्देशांकांची शंभर टक्के परिपूर्णता साध्य करावी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर"
Post a Comment