वाशिममध्ये शुक्रवारपासुन ‘वऱ्हाडी जत्रा’ महिला बचत गटांच्या उत्पादनांची भव्य प्रदर्शनी व विक्री
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिममध्ये शुक्रवारपासुन ‘वऱ्हाडी जत्रा’
महिला बचत गटांच्या उत्पादनांची भव्य प्रदर्शनी व विक्री
महिला स्वावलंबनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन आणि स्थानिक महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनी व विक्रीचा उपक्रम दि. 16 पासुन वाशिम येथे ‘वऱ्हाडी जत्रा’ नावाने आयोजित केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि. १६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बस स्टँड जवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ, मसाले, पापड-लोणची, हस्तकला, सजावटीच्या वस्तू, कापडी साहित्य आदींची प्रदर्शनी व विक्री होणार आहे.
---------
विशेष आकर्षण; फुड कोर्ट:
या प्रदर्शनिचे विशेष आकर्षण म्हणजे तीनही दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनिमध्ये वाशिमकरांना विविध खाद्य पदर्थांची मेजवानी मिळणार आहे. यासाठी यामध्ये फुड कोर्ट नावाने स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. यामध्ये अस्सल वऱ्हाडी चवीने समृध्द असलेले मटण- मांडे, सळोई, वऱ्हाडी चिकन, कोंबडी-वडा, ज्वारीची व बाजरीची भाकरी, मिसळीची भाकरी, झुणका भाकर, मिरची ठेचा, वांग्याचे भरीत, हरबऱ्याची भाजी, भरड्याची भाजी, पुरण- पोळी, तीळ-गुळ पोळी, उसळ यासोबतच आणखी विविध खाद्य पदार्थाचा गावरानी मेवा असणार आहे.
----------
या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार भावना गवळी, आमदार किरण सरनाईक, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार धीरज लिंगाडे, आमदार बाबुसिंग राठोड, आमदार अमित झनक, आमदार श्याम खोडे, आमदार सई हडके हे उपस्थित राहणार आहेत.
विशेष निमंत्रित म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जि. प. चे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि अति. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी केले आहे.
----------
या तीन दिवसीय वऱ्हाडी जत्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन, दुपारी १२ ते ६ विविध खेळ व स्पर्धा आणि संध्याकाळी ६ ते ८ विविध नृत्याचे कार्यक्रम होतील.
दि. १७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ बचत गटांच्या यशोगाथा व चित्रफीत प्रदर्शन, संध्याकाळी ४ ते ६ महिलांसाठी विविध स्पर्धा, संध्याकाळी ६ ते ८ भजन आणि रात्री ८ ते १० ऑर्केस्ट्रा होणार आहे.
दि. १८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ समारोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
------------
‘वहाडी जत्रा’ ही केवळ वस्तुंची प्रदर्शनी किंवा पारंपरिक स्वरुपातील जत्रा नसून ग्रामीण महिलांच्या कष्टांना, कौशल्याला आणि स्वाभिमानाला व्यासपीठ देणारा उत्सव आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन यांनी केले आहे.
- अर्पित चौहान (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
------------
"वऱ्हाडी जत्रा अर्थात बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनी कार्यक्रमात तिने दिवस सर्वांनी उपस्थित राहून उमेद अभियानाला चालना व गती देण्यासाठी सहकार्य करावे."
-किरण गणेश कोवे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद वाशिम.
-राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
0 Response to "वाशिममध्ये शुक्रवारपासुन ‘वऱ्हाडी जत्रा’ महिला बचत गटांच्या उत्पादनांची भव्य प्रदर्शनी व विक्री"
Post a Comment