वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे राजमाता माँ साहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे राजमाता माँ साहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
मानोरा :
वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे राजमाता माँ साहेब जिजाऊ यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदनाने करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय प्रसेन भगत सर यांनी हिरवी झेंडी दाखवून भव्य रॅलीला प्रारंभ केला. ही रॅली वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली. तेथे मुख्याध्यापक प्रसेन भगत सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी “माँ जिजाऊ वंदना” या नृत्याचे प्रभावी सादरीकरण केले. त्यानंतर रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली. दुपारच्या सत्रात शाळेच्या प्रांगणात अभिवादनाचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका कु. भालेराव मॅडम होत्या. त्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भगत सर उपस्थित होते.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. यामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत कु. चंचल नेमीचंद चव्हाण व कु. चंचल गोपाल चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत कु. साक्षी रामेश्वर राठोड, तर बाल शिवाजीच्या भूमिकेत तेजस मात्रे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रभावी नाटिका व अभिनय इयत्ता नववी (अ) च्या विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर इयत्ता आठवी ‘ब’ च्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. इयत्ता नववी ‘अ’ च्या विद्यार्थिनींनी “शिवकन्या” या गीतावर नृत्य सादर केले. तसेच इयत्ता पाचवी, सहावी व नववी ‘ब’ (प्रणिती ग्रुप) यांच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सामूहिक नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भाषणेही झाली.
अध्यक्षीय भाषणात कु. भालेराव मॅडम यांनी राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या आदर्श जीवनावर प्रकाश टाकत, विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्कारांचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक वानखडे सर, सतीश भगत सर, जयस्वाल सर, इंगोले मॅडम, चातुरकर मॅडम, इंगळे मॅडम, उजवे सर, राठोड सर, अक्षय भगत सर, मार्गे सर, मोहसीन सर, तायडे सर, पारधी सर तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे राजमाता माँ साहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी"
Post a Comment