-->

दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षितता व जनसहभागाकडे  : ‘संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप

दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षितता व जनसहभागाकडे : ‘संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप



 साप्ताहिक सागर आदित्य 

दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षितता व जनसहभागाकडे  : ‘संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप


 भारतातील १२० कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) “संचार साथी” हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे. मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रण, फसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ व प्रभावी सुविधा उपलब्ध झाली आहे.


मुंबई एलएसएच्या दूरसंचार विभागाचे संचालक विनय जांभळी आणि उपमहासंचालक  सुमनेश जोशी यांनी  महाराष्ट्रातील नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.


नागरिकांनी आपल्या मोबाईल डिव्हाइसवरील अनावश्यक अ‍ॅप्स तत्काळ काढून टाकावेत आणि फोन नेहमीच नवीनतम सुरक्षा ॲपसह अपडेट ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांनी दूरसंचार विभागाचे नागरिक-केंद्रित ‘संचार साथी’ हे अ‍ॅप डाउनलोड करून त्यातील सर्व उपयुक्त वैशिष्ट्यांचा वापर करावा.


पोर्टल आणि अ‍ॅपवरील प्रमुख सुविधा


संचार साथी पोर्टलवर “Know Your Mobile Connections”, “Block Your Lost/Stolen Mobile” आणि “Verify IMEI” या महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध आहेत. या सेवांद्वारे नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकांची माहिती तपासणे - म्हणजेच त्यांच्या नावावर एकाच ओळखीसह किती कनेक्शन आहेत हे पाहणे, हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाइल डिव्हाइस आयएमईआय ब्लॉक करणे, तसेच आयएमईआय क्रमांक आणि डिव्हाइसची प्रामाणिकता पडताळणी करणे शक्य होते.


या सुविधांमुळे मोबाईल ओळख व्यवस्थापन आणि सुरक्षिततेस मोठा हातभार लागला आहे. याशिवाय “चक्षु” या विशेष सेवेच्या माध्यमातून संशयास्पद कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेश यांची नोंद नागरिक करू शकतात. त्यामुळे फसवणूक, सायबर गुन्हे, बनावट ओळख निर्माण करणे तसेच अवांछित व्यावसायिक संदेशांवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे.


मोबाईल आयएमईआय माहिती सुरक्षित ठेवा


नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या खरेदी केलेल्या मोबाईल उपकरणांचे मूळ चलन (इनव्हाईस) सुरक्षित ठेवावे, कारण त्या चलनावर संबंधित उपकरणाचा आयएमईआय क्रमांक नमूद केलेला असतो.


जर मोबाईल उपकरणात दोन सिमकार्ड स्लॉट असतील, तर त्या उपकरणास दोन वेगवेगळे आयएमईआय क्रमांक असतात. वापरकर्त्यांनी *#०६# हा कोड डायल करून आपले आयएमईआय क्रमांक तपासावेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ईमेल, जीमेल किंवा इतर सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावा. यामुळे उपकरण हरवल्यास संबंधित माहिती सहज उपलब्ध होऊन आवश्यक कार्यवाही करता येईल.


‘संचार साथी’च्या माध्यमातून मोबाईल हरवल्यास त्याचा गैरवापर टाळता येतो, तसेच फसवणूक किंवा संशयास्पद कॉलची तक्रार नोंदवून नागरिक स्वतः सायबर सुरक्षिततेच्या साखळीत सक्रिय योगदान देऊ शकतात.


राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी


संचार साथी पोर्टलद्वारे परदेशी क्रमांक भारतीय (+९१) क्रमांक म्हणून दाखवून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. अशा तक्रारींवर दूरसंचार विभाग आणि पोलिस यांच्यातील समन्वयातून तातडीने तपास व कारवाई करण्यात येते आणि संबंधित फसवणूक नेटवर्क निष्क्रिय केले जातात. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळते.


नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल भारतीय क्रमांकावरून येत असल्यास त्वरित टोल-फ्री क्रमांक १९६३ वर माहिती द्यावी.


इतर उपयुक्त सेवा


“Find Wire line Internet Service Providers” या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातील परवाना धारक इंटरनेट सेवा प्रदात्यांची माहिती सहज उपलब्ध होते. तसेच “Trusted Contact Details” या वैशिष्ट्याचा वापर करून नागरिक संबंधित वेबसाइट, ईमेल किंवा संपर्क क्रमांकाची प्रामाणिकता पडताळू शकतात, ज्यामुळे ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करता येतो.


या उपक्रमांतर्गत २.३५ कोटी सिम-संबंधित प्रकरणांचे यशस्वी निराकरण करण्यात आले असून, ४० लाख मोबाइल हँडसेट ब्लॉक, त्यापैकी २५ लाख ट्रेस झाले आहेत. तसेच ३९ लाखांहून अधिक संशयास्पद दूरसंचार संसाधनांवर कारवाई करण्यात आली आहे.


संचार साथीचा वापर वाढविण्यासाठी दूरसंचार विभागामार्फत व्यापक जनजागृती आणि प्रसिद्धी मोहिमा राबविण्यात येत आहेत. आता या सेवा मोबाईल अ‍ॅपच्या स्वरूपातही उपलब्ध असल्यामुळे त्या अधिक सुलभ आणि सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरणार आहेत.


डिजिटल युगातील नागरिकांचा साथीदार


शासनाच्या या उपक्रमामुळे देशातील नागरिक डिजिटल युगात अधिक सुरक्षित, सजग आणि सशक्त बनत असून, “संचार साथी” हा उपक्रम नागरिकांच्या हिताचा खरा साथीदार ठरत आहे.


अधिक माहितीसाठी  www.sancharsaathi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

0 Response to "दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षितता व जनसहभागाकडे : ‘संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article