वाशिममध्ये ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ पदयात्रा उत्साहात जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिममध्ये ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ पदयात्रा उत्साहात
जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा
एक भारत, आत्मनिर्भर भारत’चा नारा;
पदयात्रेने वाशिमकरांचे वेधले लक्ष
वाशिम,
आजच्या सरदार@१५० युनिटी मार्चमधून तरुणांमध्ये देशभक्ती, सामाजिक जागरूकता आणि स्वावलंबनाची भावना अधिक बळकट होत आहे. हा उपक्रम भविष्यातील सक्षम आणि सजग नागरिक घडविण्याचा पाया ठरेल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि माय भारत वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ आणि ‘विकसित भारत पदयात्रा’ हा उपक्रम आज ११ नोव्हेंबर रोजी वाशिम शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी ८ वाजता शहरातील प्रमुख मार्गांवरून पदयात्रा मार्गस्थ झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर बोलत होते.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, माय भारत केंद्राचे कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे, प्रा.डॉ.बी.आर तनपूरे, प्रा . डॉ. पी.आर. तायडे, प्रा .डॉ. झंवर , एनसीसी अधिकारी अमोल काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर पुढे बोलताना म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात. राष्ट्रीय ऐक्याची पदयात्रा असून देशाच्या आत्म्याचा उत्सव आहे. तरुणांना सामाजिक कार्य, राष्ट्रनिर्मिती आणि स्वावलंबनासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
पदयात्रेच्या प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पदयात्रेला हिरवा झेंडा दाखविला. सहभागी तरुणांनी हातात तिरंगा घेऊन एक भारत;आत्मनिर्भर भारत, एकतेतच शक्ती, असे नारे देत शहरात ऐक्य आणि देशभक्तीचा संदेश दिला.
प्रास्ताविक श्री.ढेंगे यांनी केले. ‘एक भारत, विकसित भारत’ या संकल्पनेचा मागोवा घेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या ऐक्य, अखंडता आणि स्वावलंबनाच्या भावनेतून ही पदयात्रा साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पदयात्रेद्वारे नागरिकांना राष्ट्रीय एकता, सामाजिक बांधिलकी, स्वावलंबन आणि स्वदेशीचा अभिमान या मूल्यांची प्रेरणा देण्यात आली. याप्रसंगी श्री. कुंभेजकर यांनी उपस्थित तरुणांना आत्मनिर्भर भारताचा संकल्प करवून घेत नशामुक्तीची शपथ दिली.
या पदयात्रेला वाशिमकर नागरिक, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना व एनसीसी, एनएसएस स्वयंसेवकांनी, शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सलाम मुंबई फाउंडेशन तंबाखूमुक्त कार्यशाळा जिल्हा समन्वयक सारिका कदम, नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादुर आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन प्रा.डॉ. दिलीप लांजेवार यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.दीपक दामोदर यांनी केले.
0 Response to "वाशिममध्ये ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ पदयात्रा उत्साहात जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा"
Post a Comment