-->

महाबीजचे हरभरा व गव्हाचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध

महाबीजचे हरभरा व गव्हाचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध



साप्ताहिक सागर आदित्य 

महाबीजचे हरभरा व गव्हाचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध


वाशिम  रब्बी हंगाम २०२५-२६ करिता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) तर्फे हरभरा व गहू पिकांचे प्रमाणित, उच्च प्रतीचे बियाणे शासकीय अनुदानित दराने उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाबीजचे अधिकृत विक्रेते व उपविक्रेत्यांकडे बियाण्यांचा साठा उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वितरण करण्यात येणार आहे.


राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान (कृषी उन्नती योजना – बियाणे घटक) अंतर्गत हरभऱ्याच्या १० वर्षांच्या आतील प्रसारित वाणांवर प्रति क्विंटल पाच हजार रुपये तर १० वर्षांवरील प्रसारित वाणांवर प्रति क्विंटल अडीच हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. गहू बियाण्यांवर प्रति क्विंटल दोन हजार रुपये शासकीय अनुदान लागू असून शेतकऱ्यांना अनुदानित दरात बियाणे उपलब्ध होत आहेत.


या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, सातबारा उतारा, अॅग्रीस्टॅक क्रमांक व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व विक्री केंद्रांवर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून तत्काळ वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.


बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन


पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महाबीज प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बियाणे पिशवीत दिलेले रासायनिक बुरशीनाशक प्रथम वापरावे. तसेच पेरणीपूर्वी अर्धा ते एक तास आधी ट्रायकोडर्मा सारख्या जैविक बुरशीनाशकाने प्रक्रिया केल्यास जमिनीतून प्रसारित होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होतो. प्रति एकरी चार ते सहा किलो जैविक बुरशीनाशक वापरल्यास मातीतील हानिकारक बुरशींचा नाश होण्यास मदत होते.


अनुदानित बियाण्यासोबतच जैविक बुरशीनाशके व जैविक खतेदेखील महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. उच्च प्रतीचे बियाणे आणि योग्य बीज प्रक्रिया यामुळे उत्पादनक्षमता वाढीस हातभार लागेल, असे महाबीज जिल्हा कार्यालय, वाशिम यांनी सांगितले.


महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक  एस. एस. सावरकर यांनी शेतकऱ्यांनी उपलब्ध अनुदानाचा वेळीच लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

0 Response to "महाबीजचे हरभरा व गव्हाचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article