मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांची आढावा सभा. स्वच्छ भारत आणि जल जीवन मिशन ची कामे मार्गी लावण्याचे निर्देश.
साप्ताहिक सागर आदित्य
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांची आढावा सभा.
स्वच्छ भारत आणि जल जीवन मिशन ची कामे मार्गी लावण्याचे निर्देश.
स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर काम करणारे अभियंता आणि गट समन्वयक तथा बी आर सी सी आर सी यांची सविस्तर आढावा बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी (दि.१४) घेतली.
बैठकीला जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला १५ व्या वित्त आयोग अंतर्गत जलजीवन मिशनची किती कामे बाकी आहेत आणि किती निधी खर्च झाला, याबाबतचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. जी कामे प्रलंबित आहेत ती तात्काळ मार्गी लावून पंधरावा वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामाचे बिल काढण्याचे निर्देश:
सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे कामे पूर्ण झाली आहेत परंतु मोजमाप पुस्तिकेत नोंद न घेतल्यामुळे त्यांचे देयक काढण्यात अडचण येत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण होऊन सुद्धा देयके प्रलंबित आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व अभियंते यांना एम.बी. रेकॉर्ड करून तात्काळ बिल सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालय याबाबत तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर प्रलंबित असलेल्या कामे व निधी खर्चाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. पुढील आठ दिवसात प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण न झाल्यास आणि निधी अखर्चित राहिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी यावेळी दिले.
सीईओ चौहान यांनी याबाबत पुढील बैठक सर्व गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यासोबत लावण्याचे निर्देश प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील यांना दिले.
0 Response to "मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांची आढावा सभा. स्वच्छ भारत आणि जल जीवन मिशन ची कामे मार्गी लावण्याचे निर्देश. "
Post a Comment