अंमली पदार्थांविरोधात जिल्ह्यात समन्वयात्मक प्रयत्नांना गती द्यावी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
अंमली पदार्थांविरोधात जिल्ह्यात समन्वयात्मक प्रयत्नांना गती द्यावी
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक
वाशिम, अंमली पदार्थांचा होणारा दुष्परिणाम अतिशय गंभीर आहे. याविरोधात केवळ प्रशासन नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी शाळा, महाविद्यालय, पोलिस, शिक्षण व आरोग्य विभागांनी समन्वय साधून जनजागृती उपक्रम राबवावेत. जिल्ह्यात अंमली पदार्थांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली नार्को कोऑर्डिनेशन सेंटर (एनकॉर्ड) समितीची बैठक ११ नोव्हेंबर रोजी पार पडली.याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त पियुष चव्हाण, अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त गजानन घिरके, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, पोलिस निरीक्षक (एलसीबी) प्रदीप परदेशी, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ काळे आदींसह इतर यंत्रणा प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर पुढे बोलतांना म्हणाले की, अंमली पदार्थांविरोधात लढा ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थीवर्ग सुरक्षित राहावा, यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर व्यापक चर्चासत्रे, जनजागृती कार्यक्रम आणि अॅक्टीव्हिटी-बेस्ड संवाद सत्रे आयोजित करावीत.
शिक्षण व पोलिस विभागांनी संयुक्त कृती आराखडा (ऍक्शन प्लान) तयार करावा.पोलिस गस्ती वाढवून संशयित ठिकाणांवर सतत देखरेख ठेवावी.पानटपरी, हॉटेल, वसतिगृह आदी ठिकाणांची तपासणी नियमित करावी.
व्यसनमुक्ती विषयक मास्टर्स ट्रेनर ओळखून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी.अंमली पदार्थांची वाहतूक, वितरण आणि साठा यावर बारकाईने लक्ष ठेवावे.कृषी व वन विभागांनी अंमली पदार्थांच्या लागवडीवर नियंत्रण ठेवावे.अन्न व औषध प्रशासनाने कारवाईस सजग राहावे. असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे म्हणाले की, अंमली पदार्थांच्या विक्री, वाहतूक आणि वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागाने सर्व उपविभागीय व तालुका स्तरावर विशेष पथके कार्यरत केली आहेत. संशयास्पद ठिकाणांची तपासणी, गस्त आणि जनजागृती यावर अधिक भर दिला जाईल याबाबत सज्ज असावे.
बैठकीत समिती संबंधित अधिकारी व प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते.
0 Response to "अंमली पदार्थांविरोधात जिल्ह्यात समन्वयात्मक प्रयत्नांना गती द्यावी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर"
Post a Comment