
'ई ऑफीस' डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
'ई ऑफीस' डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
'ई ऑफीस' प्रणालीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न
वाशिम, दि. १४ ऑक्टोबर शासकीय कामकाजात पारदर्शकता, वेग आणि कार्यक्षमता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे आज दि.१४ ऑक्टोबर रोजी ई-ऑफिस प्रणालीबाबतचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
या प्रशिक्षणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रशिक्षणात ई-ऑफिस प्रणालीचा उद्देश, फायदे, वापरण्याची पद्धत, फायलींचे डिजिटायझेशन, मंजुरी प्रक्रिया, दस्तऐवजांची नोंदणी आणि ट्रॅकिंग प्रणाली याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तसेच सर्व तहसीलदार आणि सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
> “शासनाच्या कामकाजात वेग, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली अत्यंत आवश्यक आहे. पारंपरिक कागदावर आधारित कार्यपद्धतीला डिजिटल रूप देऊन प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने या प्रणालीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. डिजिटायझेशन हे आजच्या प्रशासनाचे मूलभूत अंग बनले असून, त्याद्वारे नागरिकांना अधिक तत्पर आणि अचूक सेवा देता येते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशिक्षणादरम्यान डीपीएम राहुल काकड यांनी ई-ऑफिस प्रणालीचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना प्रणालीतील सर्व टप्प्यांची माहिती दिली. ऑनलाईन फाईल तयार करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविणे, मंजुरी मिळविणे आणि नोंदी ठेवण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांना आता ई-ऑफिस प्रणालीवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रत्येक कर्मचाऱ्याने या डिजिटल प्रक्रियेचे ज्ञान आत्मसात करून कार्यक्षमता वाढवावी, असे आवाहन करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजात गती येणार असून, डिजिटल गव्हर्नन्सच्या दिशेने जिल्ह्याचे एक पाऊल असणार असल्याचे प्रतिपादन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.
0 Response to "'ई ऑफीस' डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर"
Post a Comment