
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
नोडल अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक
वाशिम, दि. १४ ऑक्टोबर
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि वेळेवर पार पडावी, यासाठी सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाचा प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक तयारीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची आज दि.१४ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी . कुंभेजकर दूरदृष्यप्रणालीव्दारे बोलत होते.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव,मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ . योगेश क्षीरसागर, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी जयेश खंडारे, शिक्षणाधिकारी (प्रा.) संजय ससाणे, प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम जगताप, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड आदी यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी पुढे सांगितले की, निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यात शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून जबाबदारीने काम करावे. सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेत व समन्वयाने काम करून प्रक्रिया निर्दोष पार पाडावी.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी निवडणुकीसंदर्भातील सर्व प्रशासकीय तयारी, आरक्षण प्रक्रिया, मतदान केंद्रांची यादी, मतदार नोंदणी, कर्मचारी प्रशिक्षण आदी बाबींवर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले.
त्यांनी पुढे म्हटले की, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, वेळेवर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठी सर्व यंत्रणांनी मिशन मोडमध्ये कार्यरत राहावे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज पारदर्शक, काटेकोर व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी कर्तव्यदक्ष आणि निःपक्ष अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक १६ जुलै २०२५ रोजीच्या आदेशान्वये, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून हाताळल्या जाणाऱ्या कामकाजासाठी नोडल अधिकाऱ्यांना सहाय्य करण्याकरिता आवश्यक अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. जिल्हा व्यवस्थापनासाठी विविध विषयवार नोडल अधिकारी नेमले असून, त्यांना सहाय्यक म्हणून संबंधित अधिकारी–कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी ही यंत्रणा ‘मिशन मोड’ मध्ये कार्यरत राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी नमूद केले आहे.
0 Response to "निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर"
Post a Comment